ग्रामीण भागातील खेरदी विक्री संघ व विकास सेवा सोसायट्यांचे अभिनव उपक्रम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील

सांगली, दि. १४   : ग्रामीण भागाच्या विकासासाठी स्थानिक खरेदी विक्री संघ, विकास सोसायट्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भाग शेतीवर अवलंबून असणारा भाग आहे. या भागात शेती हे प्रमुख जगण्याचे साधन असल्याने शेती उत्पादक मालाला योग्य भाव मिळणे आवश्यक आहे. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून कोरेगाव येथील हनुमान खरेदी-विक्री संघाने उभारलेले केळी रॅपनिंग सेंटर व इफको खताचे गोडाऊन हा अभिनव उपक्रम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

हनुमान विकास सेवा सोसायटी कोरेगाव यांच्या नवीन उभारण्यात आलेल्या केळी रॅपनिंग सेंटरचे, हनुमान खरेदी-विक्री सहकारी संस्था यांच्या नवीन गोदामांचे उद्घाटन व शाखा स्व-इमारतीत स्थलांतर तसेच इफको नॅनो युरिया विक्री शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बी.के.पाटील, प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसीलदार रवींद्र सबनीस, इफकोचे विपणन व्यवस्थापक डॉ. एस. एस. पवार, हनुमान विकास सोसायटीचे चेअरमन विनायक पुदाले, व्हा. चेअरमन आनंद शिंदे, विनायक पाटील, विजय पाटील, विश्वास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरेगावात राबवलेले केळी रॅपनिंग सेंटर व इफको खत विक्री हे नाविन्यपूर्ण उपक्रम इतरांसाठी दिशादर्शक ठरतील. रॅपनिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांची योग्य दरात केळी खरेदी केली जातील. खरेदीनंतर आठ दिवसाच्या आत पैसे बँक खात्यामध्ये जमा होतील. तसेच मागणी प्रमाणे तयार झालेला माल विक्रीसाठी दिला जाईल. त्याचबरोबर केळीसाठी लागणारी औषधे, खते  पुरवली जातील. तसेच प्रत्येक पंधरा दिवसानंतर तज्ज्ञ व्यक्तींकडून केळी उत्पादनासाठी सल्ला देणारी शिबिरे आयोजित केली जातील. एवढ्या सर्व सुविधा बरोबरच हक्काची बाजारपेठ ही शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधली जाईल, असे सांगून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करुन शेतीमध्ये शाश्‍वत उत्पादन घ्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले ग्रामीण भागाच्या विकासासाठी दळणवळण साधनावर अधिकचा भर देण्यात येत असून या अंतर्गत कोरेगाव ते भादोले या मार्गावरील पुलाचे काम मार्गी लावण्यात आली आहे. त्यामुळे कोरेगाव व आजूबाजूच्या गावांना वडगाव व कोल्हापूरचे अंतर जवळ होईल. त्याचबरोबर बाजारपेठ उपलब्ध होऊन वेळेची बचत होईल. गोटखिंडी रस्त्याची सुधारणा करण्यात येणार आहे असे ते म्हणाले. नदीकाठच्या भागातील क्षारपड जमिनी सुधारणे अंतर्गत सच्छिद्र पाइपलाइनद्वारे ड्रेनेजची व्यवस्था हा उपक्रम हाती घेतला असून प्रातिनिधिक स्वरूपात कवठेपिरान, दुधगाव, वाळवा, कसबे डिग्रज, बोरगाव या पाच गावात ही योजना राबविण्यात येणार आहे असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, वाळवा तालुक्यात यापूर्वी शाळेत जाऊन जातीचे दाखले देण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. आता यापुढे जातीचे दाखले मिळालेल्यांना जात पडताळणी करून देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात श्री हनुमान संस्थेचे संस्थापक बी. के. पाटील यांनी संस्थेची माहिती दिली. तसेच राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विपणन व्यवस्थापक डॉ. एस. एस. पवार यांनी इफकोच्या खतांबाबत माहिती दिली. प्रारंभी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन मंजूर झालेल्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.के.पाटील यांनी केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *