कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते चाकण येथील सागर डिफेन्स स्टार्टअपचे उद्घाटन

पुणे, दि. २१: संरक्षण विभागासाठी ड्रोन, मानवविरहित नौका, आधुनिक सुरक्षा व टेहळणी उपकरणे बनवणाऱ्या सागर डिफेन्स इंजिनिअरिंग या स्टार्टअप उद्योगाच्या चाकण प्रकल्पाचे उदघाटन उद्योजकता व कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री. मलिक यावेळी म्हणाले, संरक्षण विभागासोबत काम करू इच्छिणाऱ्या उद्योगांना या क्षेत्रात चांगल्या संधी आहेत. तंत्रकुशल युवक, उद्योजक यांच्यामुळे संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशल इंटेलिजन्स), रोबोटिक्स यांचा वापर अजूनही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. डीआरडीओ तसेच अशा स्वरूपाच्या संरक्षण विभागाच्या उपक्रमांसोबत संशोधन करून अधिक प्रभावी संरक्षण उत्पादने बनवण्यास मोठी संधी आहे. सागर डिफेन्सची यादिशेने होणारी प्रगती अभिनंदनीय आहे.

या स्टार्टअप उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास पराशर, सह-संस्थापक मृदुल बब्बर, लक्ष्य डांग यांनी मंत्री श्री. मलिक यांना कंपनी आणि उत्पादनांविषयी माहिती  दिली.

यावेळी जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी नलावडे हणमंत, कनिष्ठ कौशल्य व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, शिवाजी वाळुंज आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *