भारतीय नौदलात  MH-60r या दोन हेलिकॉप्टरच्या पहिल्या तुकडीचा समावेश 

भारतीय नौदलात  MH-60r या दोन हेलिकॉप्टरच्या पहिल्या तुकडीचा समावेश

भारतीय नौदलाने MH-60r या बहुकार्यप्रवण असलेल्या दोन हेलिकॉप्टरची पहिली तुकडी अमेरिकेच्या नौदलाकडून सॅन दिएगो येथे नॉर्थ आयलंडवरील नौदलाच्या तळावर समारंभपूर्वक स्वीकारली. या समारंभाद्वारे या हेलिकॉप्टरचे अमेरिकी नौदलाकडून भारतीय नौदलाकडे अधिकृत हस्तांतरण झाले. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी भारतीय नौदलाच्या वतीने ही हेलिकॉप्टर्स स्वीकारली. या समारंभात अमेरिकी नौदलाच्या हवाई दलाचे कमांडर वाईस ऍडमिरल केनेथ व्हिटसेल यांनी या हेलिकॉप्टरची कागदपत्रे भारतीय नौदलाचे उपनौदलप्रमुख वाईस ऍडमिरल रवनीत सिंग यांच्याकडे सुपूर्द केली.

MH-60r या हेलिकॉप्टर्सचे उत्पादन लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशन या अमेरिकी कंपनीने केले असून सर्व प्रकारच्या हवामानात विविध प्रकारच्या मोहिमांमध्ये काम करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक एवियॉनिक्स/सेन्सर्सचा वापर करून त्यांची रचना करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या 24 हेलिकॉप्टर्सची खरेदी अमेरिकेकडून करण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये विविध प्रकारची भारतीय सामग्री आणि शस्त्रे बसवण्यासाठी सुधारणा देखील करण्यात येणार आहे. MH-60r या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या त्रिमितीय क्षमतेत आणखी वाढ होणार आहे. या हेलिकॉप्टरचा त्यांच्या क्षमतेनुसार वापर करता यावा यासाठी भारतीय कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे सध्या अमेरिकेत प्रशिक्षण सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *