राज्यात अतिवृष्टी व महापूराची अभूतपूर्व परिस्थिती
एनडीआरएफ, लष्कर, नौदलाचा मदतकार्यात सहभाग
मुंबई, दि. २४ : राज्यात अतिवृष्टीमुळे व दरड कोसळून झालेल्या नागरिकांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहितीही त्यांनी दिली. या संकटकाळात संपूर्ण महाराष्ट्र एकजूट असून निर्माण झालेल्या परिस्थितीचा महाराष्ट्र निर्धारानं सामना करील, आपत्तीग्रस्तांचा बचाव, मदत व पुनर्वसनाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असेल, असे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
राज्यात सर्वदूर होत असलेली अतिवृष्टी आणि निर्माण झालेली पूरस्थिती अभूतपूर्व असून, प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा, एनडीआरएफ, लष्कर, नौदल, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहकार्यानं युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य करीत आहेत. नदीकाठच्या व पूररेषेतील नागरिकांनी सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा, स्थिती पूर्ववत होईपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाने स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आपत्तीग्रस्त नागरिकांना निवारा, खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी, औषधे आदी मदत उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.