जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीवर कृषी विभागाने नियोजन करून निर्बंध आणावेत; बियाण्यावर निर्धारित दरापेक्षा अधिकचा दर लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी
-पालकमंत्री अमित देशमुख
बियाणे उगवले नाही अशा कंपन्यांना संपूर्ण नुकसान भरपाई देई पर्यंत जिल्ह्यात बियाणे विक्रीवर बंदी घालण्या बाबत कार्यवाही करावी
जिल्ह्यातील ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश
सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप अधिकाधिक व्हावेत यासाठी चालणा द्यावी
घरचे सोयाबीन बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी उगवणी टेस्ट करून बियाणे पेरावे
जिल्ह्यासाठी एक लाख नऊ हजारापेक्षा अधिक मेट्रिक टन रासायनिक खताचे आवंटण
लातूर, दि.१४ :- जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीवर कृषी विभागाने नियोजन करून निर्बंध आणावेत, बोगस बियाणे बाजारात विक्री होणारच नाही, याची दक्षता घ्यावी तसेच एखाद्या कंपनीचे बियाणे उगवले नाही, अशा कंपनीवर जिल्ह्यात शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणार नाही तो पर्यंत निर्बंध घालण्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही करावी असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात लातूर जिल्हा खरीप हंगामपूर्व – २०२२ च्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस यावेळी दृकश्राव्य प्रणालीद्वारे ( ऑनलाईन ) आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. बाबासाहेब पाटील, आ. रमेश कराड, तर प्रत्यक्ष आ.धीरज विलासराव देशमुख, आ.अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी विभाग जलसंपदा विभाग, महावितरण विभाग, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या बँका पीक कर्ज देत नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देऊन पीक कर्जाच्या बाबतीत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची एन ओ सी मागितली जाणार नाही असे फलक बँकांच्या दर्शनी भागात लावण्याची कार्यवाही करावी अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिल्या.
घरचे बियाणे वापरणाऱ्यांनी उगवणी टेस्ट करून आणि पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी असे सांगून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक सौर पंप बसविण्यासाठी प्रोत्साहन देण्याबाबतही पालकमंत्री यांनी यावेळी निर्देश दिले.
विजेचा अपव्यय थांबविण्यासाठी उपाय योजना
जिल्ह्यात अनेक ठिकाणी खांबावर दिवसा दिवे लागलेले दिसतात हा विजेचा अपव्यय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थानी यावर लक्ष द्यावे ही अत्यंत गंभीर बाब आहे. दिवस मावळला की आपोआप लाईट लागण्याची आणि दिवस उगवला की बंद होण्याची डिजिटल यंत्रणा बसवाव्यात आणि हा अपव्यय थांबवावा असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.
पी.एम. किसान योजनेबाबत कार्यवाही
पी एम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा लाभ, त्यात असलेल्या त्रुटी ताबडतोब काढून पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रयत्न करावे, तसेच कृषी सहायकांनी पूर्ण क्षमतेनी काम करावे, त्यासाठी त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे असे निर्देशही पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिले.
महावितरणला किती निधी उपलब्ध झाला आणि किती खर्च झाला याचाही आढावा घेण्यात आला.
यामध्ये मागील तीन वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून दिलेल्या निधीतून किती ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत, याचाही आढावा यावेळी घेण्यात आला. एखादा कंत्राटदार जर यासंदर्भात काम करीत नसतील तर त्या कंत्राटदारावर कारवाई करण्याच्याही सूचना या बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.
कोणीही लिंक पध्दतीने बियाणे विकणार नाही याची काळजी घेण्याबाबत दक्ष राहून पेरणी पुर्वी जिल्हयात रासायनीक खताची उपलब्धता करून घ्यावी. खताच्या योग्य वापराबाबत शेतकऱ्यांत जागृती निर्माण करून घरच्या घरी मिश्र खत तयार करण्या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबाबतही पालकमंत्री अमित देशमुख यांनी कृषी विभागाला सांगितले.
महाडीबीटी वेबसाईट वापरात सुसुत्रता आणावी असे सांगून योजनांसाठी अर्ज दाखल करतांना शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे तसेच मंजूर योजना संदर्भात शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करावे.कृषी योजना संबंधीची सर्व माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी. शेतकऱ्यांना कृषी विमा मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याबाबतही पालकमंत्री यांनी निर्देश दिले.
कृषी विमा संदर्भात इतर जिल्ह्यासाठी न्यायालयाकडून आलेल्या निकालाचा अभ्यास करून न्यायालयाच्या निकालानुसार लातूर जिल्हयात पिकवीमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत या सुचनासह बैठकीत झालेल्या चर्चेच्या संदर्भाने तातडीने अमंलबजावनी करून आठ दिवसात अनुपालन अहवाल लोकप्रतिनिधींना मिळेल या संबंधिचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी या बैठकी दरम्यान दिले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी उपस्थित मुद्दे व अनुपालन अहवाल, लातूर जिल्हा सर्वसाधारण माहिती, पर्जन्यमान, पावसाचा खंड, अतिवृष्टी, क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता, प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री फळपिक विमा योजना, गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजना, बियाणे नियोजन खरीप-2022, खताचे नियोजन – मागणी व पुरवठा, गुण नियंत्रण नियोजन व कार्यवाही, कृषि विस्तार विषयक योजना, फलोत्पादन घडीपत्रिका, राज्यस्तरीय सोयाबीन परिषद, विकेल ते पिकेल, आत्मा, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, बांबु लागवड, शासकीय हमी भाव खरेदी, सिंचनाची सद्यस्थिती, महावितरण आदिबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
सर्वश्री आमदार महोदयांच्या सुचना लक्षात घेवून जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी संयुक्तिक समन्वयाने त्यांच्या सुचनांचे निराकरण करण्यात यावेत. तसेच त्यांचा अहवाल कृषि विभागाने सर्वश्री आमदार महोदयांना आठ दिवसाच्या आत त्यांच्या सुचनांचे अनुपालन व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठविण्यात यावा, असेही पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सुचना केल्या.