लाभार्थी मेळावे (गाऱ्हाणी बैठकी) घ्या, समन्वयाने काम करा
नागपूर, दि. १८ : नियमित लाभ मिळत नाही असे लाभार्थी व इतर प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढून लवकरात लवकर अहवाल सादर करा, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधितांना दिल्या. त्यासोबतच दलालांपासून सावध राहून अधिकारी व समिती सदस्यानी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार अभिजीत वंजारी, राजू पारवे, जिल्हाधिकारी आर. विमला, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, तहसीलदार चैताली सावंत व संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
कोरोना महामारीत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांची प्रकरणे प्राथम्याने निकाली काढून विधवा व असाहय व्यक्तीस मदत करा. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी समिती सदस्य तसेच नागरिकांशी सौजन्याने वागावे. या प्रकरणात दिरंगाई करुन नये, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
उदार मनाने सदस्याने जनसेवा करावी. गरीब, गरजू व वंचित लोकांना सहाय्य करावे. पालकमंत्री वर्षातून एकदाच या समितीचा आढावा घेत असतात. परंतु अशा प्रकारे समिती सदस्य आणि अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव योग्य नाही. अधिकारी व समिती सदस्यांनी समन्वयाने सर्व प्रकरणांची आपल्यास्तरावर सोडवणूक करा. मध्य, पूर्व, उत्तर, दक्षिण अशा प्रकारे चार्ट तयार करुन लाभार्थ्यांना लाभ कसा देता येईल याकडे लक्ष दया, असे डॉ. राऊत म्हणाले.
विधवा, गरीब, वंचितांचे प्रकरण तपासून समितीसमोर सादर करा. नंतरच त्यास पात्र-अपात्र ठरवा. लाभार्थ्यांना कागदपत्र मागा, त्याची तपासणी करा. काही जटील प्रकरणांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन मेळावे घ्या, या मेळाव्यास मी सुध्दा हजर राहीन, असे त्यांनी सांगितले.
यावेळी समिती सदस्यांनी अनेक प्रकरणावर पालकमंत्र्यांना अवगत केले. त्यावर पालकमंत्र्यांनी योग्य व्यक्तीस अनुदान मिळावे, यावर लक्ष केंद्रीत करा. दलालामार्फत बनावट दाखले सादर केल्यास त्यास अपात्र ठरवा, अशा सूचना केल्या. समिती सदस्यांनी लाभार्थ्यांच्या घरी जावून सद्यस्थिती जाणून घ्यावी व कागदपत्राची तपासणी करावी. कोणत्याही लाभार्थ्यांस त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले.
या बैठकीत सहभागी झालेल्या आमदारांनी देखील यावेळी आपले अभिप्राय दिले. महानगर असो वा ग्रामीण भाग या योजनेत बसणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना, अपंगांना व महिलांना ही अल्प मदत मिळालीच पाहिजे यासाठी काम करण्याचे त्यांनी सूचित केले.
दरवेळी बैठकीचे इतिवृत्त लोकप्रतिनिधींना सादर करा, तसेच योग्य लाभार्थीस लाभ मिळेल याकडे कटाक्षाने लक्ष वेधा. कमिटी सदस्यांनी घेतलेला निर्णय अंतिम असतो. लाभार्थी कुटुंबातील २५ वर्षापेक्षा जास्त वय असलेली मुलगी दुर्धर आजारासाठी योजनेस पात्र ठरु शकते, असे आमदार राजू पारवे यांनी सांगून त्यानुसार कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार अभिजीत वंजारी यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक गावातल्या वार्डातील लाभार्थ्यांपर्यंत शासन कसे पोहोचेल याबाबतचे नियोजन करणे गरजेचे आहे. ही योजना जगण्याला स्थैर्य आणि अपंग असाह्य ज्येष्ठ नागरिकांना स्वाभिमानाने जगायला मदत करणारी आहे. त्यामुळे या योजनेकडे सामाजिक दायित्वातून लक्ष वेधण्याचे आवाहन त्यांनी केले.
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे गाऱ्हाणी बैठका घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी संबंधितांना दिल्या. दैनंदिन कामकाज सुकर कसे करता येईल व नागरिकास न्याय वागणूक कशी मिळेल, यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत २२ बैठका घेण्यात आल्याची माहिती तहसीलदार चैताली सावंत यांनी दिली. तसेच बँकलिंक आधारकार्ड धारकांची प्रकरणे निकाली काढण्यात आली असून ९०३६ प्रकरणापैकी ४ हजार ३१६ प्रकरणे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.