उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर मानसिक स्वास्थ्याच्या प्रश्नाला एक सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून प्राधान्य देण्यावर भर दिला.
वेगवान, सुखासीन जीवनशैली लोकांमध्ये ताण आणि चिंताग्रस्तता निर्माण करू शकते असे निरीक्षण नोंदवत, जीवनाबाबतचा अध्यात्मिक दृष्टीकोन तणाव घालवायला मदत करू शकेल असे त्यांनी सुचविले. धार्मिक नेत्यांनी अध्यात्माचा आणि सेवेचा संदेश युवकांपर्यंत तसेच सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा असे आवाहन त्यांनी केले.
कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशांतील प्राचीन हिंदू मंदिरांबद्दल माहिती देणाऱ्या आणि आंध्रप्रदेशचे माजी आमदार एन.पी.वेंकटेश्वर चौधरी यांनी लिहिलेल्या तेलगु भाषेतील दोन पुस्तकांचे आभासी पद्धतीने अनावरण करताना नायडू म्हणाले की, या मंदिरांतील कला आणि स्थापत्य प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवितात. ‘कंबोडिया- हिंदू देवालय पुण्य भूमि’ आणि ‘नेति व्हिएतनाम – नाति हैन्दवा संस्कृती’ अशी शीर्षके असलेल्या या दोन पुस्तकांचा संदर्भ देताना, उपराष्ट्रपतींनी कंबोडियामधील अंगकोर वट मंदिराला दिलेल्या भेटीची आठवण काढली. ते म्हणाले की प्रत्येकाने, विशेषतः युवा वर्गाने अशा मंदिरांना भेट देऊन भारताच्या गौरवशाली भूतकाळाबद्दल माहिती घेतली पाहिजे.
शिक्षण,कला, संस्कृती आणि धर्माच्या बाबतीत महत्त्वाची केंद्रे म्हणून भारतातील मंदिरांनी आपल्या इतिहासकाळात बजावलेल्या मध्यवर्ती भूमिकेबद्दल देखील उपराष्ट्रपतींनी भाष्य केले. सामान्य जनतेच्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून मंदिरे सामाजिक एकोपा राखण्यासाठी महत्त्वाची होती याकडे त्यांनी लक्ष वेधले. संगीत, नृत्य, नाटक आणि शिल्पकला यांचे केंद्रबिंदू म्हणून मंदिरांची कशी भरभराट झाली हे देखील त्यांनी उधृत केले. स्वराज्य प्राप्तीच्या चळवळीदरम्यान देखील मंदिरे अत्यंत महत्त्वाची होती टिप्पणी उपराष्ट्रपती नायडू यांनी केली.