मुंबई, दि. ११ : गोवा मुक्ती लढा तसेच सन १९७१ च्या युद्धात गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या आयएनएस विक्रांत या भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकेच्या प्रतिकृतीचे शुक्रवारी श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, कुलाबा मुंबई येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे व नौदलाचे अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी उपस्थित होते.
विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतला दिनांक ३ नोव्हेंबर १९६१ रोजी भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले. छत्तीस वर्षे सर्वोत्तम सेवा दिल्यानंतर विक्रांत युद्धनौकेला जानेवारी १९९७ मध्ये निवृत्त करण्यात आले व त्यानंतर सन २०१२ पर्यंत ते तरंगते संग्रहालय म्हणून सेवेत होते.
नौदलाने दिलेल्या माहितीनुसार आयएनएस विक्रांत विमानवाहू युद्धनौका म्हणून नव्या रूपाने कोचीन शिपयार्ड येथे पुनश्च तयार होत आहे. लवकरच ही युद्धनौका आयएनएस विक्रांत याच नावाने नौदलात समाविष्ट केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.