४३ बेसहाऱ्यांची स्वच्छता, आरोग्य तपासणी, नवीन कपड्यांचे वाटप; प्रेरणा घेऊन नवीन सेवाप्रकल्प सुरू करणार – हनुमंत डोंगरगावकर.
नांदेड प्रतिनिधी : समाजातील बेसहारा, निराधार आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तींना सन्मानाने जगण्याची नवी उमेद देणारा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून सुरू असलेला ‘कायापालट’ हा अनोखा मानवतावादी उपक्रम सातत्याने सुरू आहे. या उपक्रमाच्या ८३ व्या पर्वात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी तब्बल ४३ निराधार व्यक्तींचा कायापालट करण्यात आला. स्वच्छता, नवीन कपडे, आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि मायेच्या सहवासातून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा उपक्रम राबविण्यात येतो. या सेवाकार्याला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, महानगराध्यक्ष आ. अमर राजूरकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे व ॲड. चैतन्य देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, जिल्हा सरचिटणीस विजय येवणकर, शीतल खांडील, विजय गंभीरे, सुषमा थोरात तसेच लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
८३ व्या उपक्रमात स्वयंसेवक राजू अण्णा पुसनूर, व्यंकटेश आणि नीलकंठ यांनी निराधार व्यक्तींचे केस कापून व दाढी करून त्यांना स्वच्छ आणि नीटनेटके रूप दिले. महेंद्र शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत त्यांना स्नान घातले, तर स्वच्छ पाण्याची व्यवस्था कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांनी केली. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या वतीने सर्वांना नवीन कपडे, चहा-फराळ तसेच प्रत्येकी १०० रुपयांची प्रोत्साहनपर बक्षिसी देण्यात आली. स्नेहलता जायस्वाल आणि निता दागडिया यांनी पोहे व चहाचे वाटप केले. डॉ. अर्जुन मापारे यांनी मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार केले.
या उपक्रमाला महावितरणचे कार्यकारी अभियंता हनुमंत डोंगरगावकर यांनी सदिच्छा भेट दिली. उपक्रमाचे स्वरूप, त्यामागील सामाजिक बांधिलकी आणि निराधार व्यक्तींसाठी केले जाणारे सेवाकार्य पाहून त्यांनी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचे विशेष कौतुक केले. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन ॲड. दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच आणखी एक नवीन सेवाप्रकल्प सुरू करण्याचा मानस असल्याचे डोंगरगावकर यांनी यावेळी सांगितले.
उपक्रमाची सांगता झाल्यानंतर स्वयंसेवकांनी संपूर्ण परिसर स्वच्छ केला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश शर्मा, अरुण काबरा, प्रभुदास वाडेकर, प्रकाश उंटवाले, गणेशसिंह परमार, राजेशसिंह ठाकूर आणि रुद्र जोड यांनी विशेष परिश्रम घेतले.
समाजसेवा म्हणजे केवळ गरजूंना मदत करणे नव्हे, तर त्यांच्या मनात आत्मसन्मान आणि जगण्याची उमेद निर्माण करणे होय. गेली ८३ महिने सातत्याने सुरू असलेला ‘कायापालट’ उपक्रम याच मानवतावादी विचारांचा आदर्श निर्माण करत आहे. ४३ निराधार व्यक्तींच्या चेहऱ्यावरील समाधान आणि डोळ्यांतील आनंद हीच या सेवाकार्याची खरी कमाई असल्याचे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
