देगलूर प्रतिनिधी: सलग ३१ दिवस प्रामाणिकपणे काम करूनही कामगारांना त्यांच्या हक्काचा पूर्ण पगार वेळेवर मिळत नसल्याच्या निषेधार्थ देगलूर आगारात आज दुपारी १२ वाजता घंटानाद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाच्या माध्यमातून चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी एकजूट दाखवली. कामगारांच्या घामाचा योग्य मोबदला वेळेवर मिळावा आणि वेतनासंदर्भातील समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात कामगार संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास बाचावार साहेब, मधुकर शिरेवार, कामगार संघटनेचे सक्रिय सदस्य निखिल भैय्या तोटावार यांच्यासह कामगार संघटनेचे सर्व सभासद व आगारातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
