‘म्हाडा’ मार्फत ५ हजार १८३ कुटुबांना हक्काचे घर

पुणे, दि.१५ :- पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत (म्हाडा) विविध उत्पन्न गटाअंतर्गत सदनिकांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून जिल्ह्यातील अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील ५ हजार १८३ पात्र कुटुंबाला हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ‘२०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर’ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्याच ध्येयाच्या दिशेने पडलेलं एक आश्वासक पाऊल आहे.

राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. घरे उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया संगणकीय असून पारदर्शक आहे. कोविड काळातही म्हाडाच्या घरासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देवून जनतेने ‘म्हाडा’वर विश्वास दाखविला आहे.

खेड तालुक्यात म्हाळुंगे (इंगळे) येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील ६४८ व अल्प उत्पन्न गटातील ६२० अशा एकूण १ हजार २६८ तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात सर्व्हे क्रमांक-३०९ पिंपरी-वाघिरे येथे अल्प उत्पन्न गटातील ३०८, मध्यम उत्पन्न गटातील 595 आणि उच्च उत्पन्न गटातील ३४० अशा एकूण १ हजार २४३ कुटुंबांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी सदनिकांची गृहनिर्माण योजना राबविण्यात आली होती. पात्र लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शासनाच्या धोरणानुसार १५ टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत (इंटिग्रेटेड हाऊसिंग) १ हजार ८० अत्यल्प व अल्प उत्पन्न गट सदनिका तसेच २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अंदाजे १ हजार ५९२ अत्यल्प व अल्प उत्पन्न गट सदनिका अशा एकूण २ हजार ६७२ सदनिका उपलब्ध झाल्या असून त्यांची जाहिरात देऊन अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप करण्यात येत आहे.

तळेगाव दाभाडे येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटाकरीता ७६२ सदनिकांची गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहे. तसेच ३५ दुकाने व ३१ कार्यालये अशा वाणिज्य व विविध गृहनिर्माण योजना राबविण्यात येत असून योजनेचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याची माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *