नागरिकांना कन्नड उपविभागीय कार्यालयात चांगल्या सेवा मिळणार

औरंगाबाद, दिनांक ०३ :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र साकारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्यासह औरंगाबादच्या विकासाला शासनाचे प्राधान्य असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिली. जिल्ह्यातील कन्नडवासीयांना उपविभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीमुळे चांगली सेवा मिळण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.

पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते कन्नड उपविभागीय कार्यालयाचे लोकार्पण झाले. याप्रसंगी ते बोलत होते. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, सर्वश्री आमदार अंबादास दानवे,  उदयसिंग राजपूत, नगराध्यक्ष स्वाती कोल्हे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते उपस्थित होते.

कन्नड तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीकोणातून महत्त्वाचा असलेल्या कन्नड-चाळीसगाव बोगदा व इतर पर्यायासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. या कामाची मागणी पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री देसाई म्हणाले.

कोरोना काळात जनतेने सहकार्य केल्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी मदत झाली. या काळात शासनाने आरोग्य सुविधेत वाढ केली. आरोग्य सुविधेत वाढ झाली असली, तरीदेखील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी. शासनाने सांगितलेल्या सर्व कोविड विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना, अनुरूप नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मंत्री देसाई यांनी केले.

महसूल राज्यमंत्री सत्तार यांनी कन्नड उपविभागीय कार्यालयाच्या नवीन सुसज्ज अशा इमारतीमुळे येथील नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. जनतेचे प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लागण्यास यामुळे मदत होईल. शेतकऱ्यांना सेवा देण्यात या कार्यालयाची महत्त्वाची भूमिका आहे. कन्नड-चाळीसगाव बोगदा व पर्यायी सुविधेसाठीही शासनस्तरवरून प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले. कन्नड उपविभागीय कार्यालयाने कोविड काळात उत्तम कार्य केले आहे. तालुक्यातील आरोग्य सुविधेत भर घातल्याचेही राज्यमंत्री सत्तार म्हणाले. आमदार राजपूत यांनी केलेल्या मागणीप्रमाणे कन्नड तालुक्यातही तलाठी कार्यालये करण्यास प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आमदार दानवे यांनी कन्नड उपविभागीय कार्यालयाच्या सुसज्ज अशा इमारतीचे कौतुक केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या सर्व सुविधा या ठिकाणी जनतेला देण्यात याव्यात, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. आमदार राजपूत यांनी कन्नड उपविभागाचे महत्त्व सांगतानाच कन्नड तालुक्यामध्ये तलाठी कार्यालये स्थापन करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी कन्नड उपविभागीय कार्यालयाची स्थापना २०१३ मध्ये झाली. कन्नडच्या विकासात या कार्यालयाचे महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले.

सुरूवातीला कोनशिलेचे अनावरण व फीत कापून मंत्री देसाई यांच्याहस्ते उपविभागीय कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर कार्यालयाची पाहणी त्यांनी केली व कार्यालय परिसरात वृक्षारोपनही केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *