राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम

मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाण्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार

उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट

नागरिकांनी अतिशय काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई दि ०३: राज्यातील कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरविणार आहे. अशा रितीने हे १४ जिल्हे सोडून राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे . आज सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ब्रेक दि चेनचे आदेश जारी केले आहेत. ते उद्यापासून लागू होणार असून

काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले असले तरी नागरिकांनी आरोग्याचे नियम पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरत राहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

 

ज्या ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध लागू राहतील ते पुढीलप्रमाणे आहेत : कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर. या जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्हिटी दर आणि दैनंदिन वाढती रुग्ण संख्या पाहता या जिल्ह्यांतील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन किती प्रमाणात कडक निर्बंध लावायचे त्याचा निर्णय घेतील.

मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरवतील.

उर्वरित जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये खालीलप्रमाणे सूट राहील

सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ पर्यंत सुरु राहतील. रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहतील.

सर्व सार्वजनिक उद्याने, मैदाने व्यायाम, चालणे, धावणे , सायकलिंग आदींसाठी खुले करण्यात आले आहेत.

सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने  सुरु ठेवणार. प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याची सूचना

जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरु ठेवता येऊ शकतात ती तशी सुरु ठेवण्याची सूचना.

सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.

जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय यांनी वातानुकूलन वापरायचे नसून, सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स हे बंद राहतील. यात कोणतीही सूट नाही.

राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे बंदच राहतील.

शाळा, महाविद्यालयांच्याबाबतीत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल.

सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र आरोग्याच्या कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागेल. टेक अवे किंवा पार्सल सेवा सध्याप्रमाणे सुरु ठेवता येईल.

रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही.

गर्दीमुळे संसर्ग वाढू नये म्हणून वाढदिवस समारंभ, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार, मिरवणुका, निदर्शन मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत

मास्क वापरणे, सुरक्षित अंतर यासारखे कोरोना प्रतिबंधक नियम सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग कायदा, आणि भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल.

ऑर्डर ची कॉपी खालीपाहूशकता

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *