शासकीय व्यवस्था सक्षम व सुदृढ करण्यासाठी ‘वंदे मातरम् चांदा’ तक्रार निवारण यंत्रणा

 

 

चंद्रपूर, दि. १५ :- शासकीय कार्यालयातील प्रलंबित अर्ज व तक्रारींच्या आधारे कार्यालयाची गुणवत्ता निश्चित होण्यासाठी तसेच नागरिकांना शासनाच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणीचे निराकरण होण्याकरिता व तक्रारीचे जलद गतीने, सोयीस्कर व प्रभावी निवारण करण्याकरिता ‘वंदे मातरम‌् चांदा’ तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तक्रार नोंदविण्याकरीता टोल फ्री क्रमांक आणि पोर्टल या दोन्ही बाबींचे १५ फेब्रुवारी २०२३ रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याबाबत पालकमंत्र्यांनी नियोजन सभागृह येथे आढावा घेतला.

बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक रविंद्र परदेसी, उपविभागीय अधिकारी मरुगनांथम एम., जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, महिनाभरात कोणत्या विभागाशी संबंधित कशा प्रकारच्या तक्रारी येतात, त्याची पडताळणी करावी. या यंत्रणेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व टीमला संवेदनशील राहणे आवश्यक आहे. जो विभाग वेगाने समस्यांचे निराकरण करेल, त्या विभागाचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे, यासारखे उपक्रम राबविल्यास इतरही विभागांना चालना मिळेल. सदर यंत्रणा सुरू झाल्यानंतर पहिल्या महिन्यात विश्लेषण करा. तक्रारींचे स्वरूप काय आहे, ते तपासा. तक्रारी विविध प्रकारच्या येऊ शकतात, त्याचे निराकरण संवेदनशीलपणे करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

 

 

 

काय आहे ‘वंदे मातरम चांदा’ तक्रार प्रणाली : ही प्रणाली जिल्ह्यातील नागरिक व प्रशासन यामधील दुवा सारखे काम करेल. ‘वंदे मातरम चांदा’ ही स्मार्ट ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणाली जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तयार केली असून, या अंतर्गत सर्व सरकारी विभाग ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एका देखरेखीखाली येणार आहे.

 

 

सदर व्यासपीठ लोकाभिमुख प्रशासनाच्या बाजूने काम करेल आणि शासन यंत्रणेच्या कार्यक्षमतेत सुधारणा करेल. वंदे मातरम चांदा ही तक्रार दाखल करण्याची योजना असून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या थेट देखरेखीखाली असणार आहे.

 

 

 

तक्रार नोंदवण्यासाठी १८००-२३३-८६९१ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. कार्यालयीन वेळेत सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सदर टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे. सदर तक्रारीची नोंद झाल्यानंतर तक्रार कर्त्यास त्याच्या मोबाईल नंबरवर एसएमएस द्वारे टोकन नंबर मिळेल. या टोकन नंबर द्वारे केलेल्या तक्रारीबाबत सद्यस्थितीची माहिती मिळू शकेल.

 

 

 

 

टोल फ्री क्रमांकावरील प्राप्त तक्रारी vandemataramchanda.in या संकेतस्थळावर नोंदवली जाईल व संबंधित विभागात पुढील कार्यवाही पाठविली जाईल. तक्रारीची नोंद झाल्यावर सदर संकेतस्थळावर टोकन नंबरचा वापर करून तक्रारकर्त्यास आपल्या तक्रारीची सद्यस्थिती व विभागाकडून झालेल्या कार्यवाहीबाबतची माहिती मिळेल. तक्रारकर्ते टोल फ्री नंबर व्यतिरिक्त vandemataramchanda.in या संकेतस्थळाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपली तक्रार नोंदवू शकतात.

 

 

 

 

 

तक्रारकर्त्यास जर विभागाचे उत्तर असमाधानकारक वाटल्यास तक्रारकर्ते टोल फ्री क्रमांक वर कॉल करून असमाधानी असल्याचे सांगितले तर ती तक्रार संबंधित विभागाला पुन्हा पाठविण्यात येईल, असे प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *