नवी दिल्ली, २८ : । महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांची प्रशासकीय बदली झाली असून काल त्यांना कार्यालयाच्यावतीने निरोप देण्यात आला.
परिचय केंद्रात आज निरोप समारंभ आयोजित करण्यात आला, जनसंपर्क अधिकारी अमराज्योत कौर अरोरा यांनी श्री कांबळे यांचे स्वागत केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी व अभ्यागत उपस्थित होते.
श्री कांबळे यांनी २६ ऑगस्ट २०१३ रोजी महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्लीच्या उपसंचालक पदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्या नेतृत्वात कार्यालयाने राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळांसह विविध महत्वाचे उपक्रम राबविले. कार्यालयाची एसएमएस सेवा, तीन भाषांमधील ट्विटर हँडल्स यासह समाज माध्यमांद्वारे जनसंपर्काचे उत्तम कार्य झाले. लोकसभा, विधानसभा पूर्वपिठिका, खासदार परिचय पुस्तिका आदी कार्यालयाचे प्रकाशने व कार्यालयाच्यावतीने प्रदर्शनांचे यशस्वी आयोजनही करण्यात आले. दिल्ली स्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या (SIPRA) संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. या कार्यालयाचे उपसंचालक म्हणून त्यांनी आठ वर्षांचा कालवधी पूर्ण केला आहे. नुकतीच श्री. कांबळे यांची प्रशासकीय कारणास्तव माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मुख्यालयात (मुंबई) वृत्त व जनसंपर्क उपसंचालक म्हणून बदली झाली आहे.
या निरोप समारंभास हरियाणा परिचय केंद्राचे उपसंचालक जगदीप दुहान, तेलंगणा परिचय केंद्राच्या उपसंचालक हर्षा भार्गवी, ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी, पत्रकार निवेदिता वैशंपायन यांच्यासह अभ्यागत उपस्थित होते.
अमरज्योत कौर अरोरा यांना उपसंचालकपदाचा अतिरीक्त कार्यभार
दयानंद कांबळे यांनी काल कार्यालयाच्या उपसंचालकपदाचा कार्यभार कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी अमराज्योत कौर अरोरा यांना सूपर्द केला. श्रीमती अरोरा आता महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक पदाचा अतिरीक्त कार्यभार सांभाळणार आहेत.