बीड जिल्ह्यातील निजामकालीन ३८९ शाळांचे होणार पुनरुज्जीवन; ३७ कोटी रुपये निधी मंजूर

बीड जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

बीड,  दि.१९  : शिक्षण देणे म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानदान, त्याला केवळ व्यवसाय न समजता मनातून सेवाभाव समजून ज्ञानदान करणारे सर्वच शिक्षक आदर्श आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहेत. ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.

बीड जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक अशा २१७  शाळांमधील वर्गखोल्या पुनर्बांधणी कामे व १७२  शाळांमधील दुरुस्ती कामे अशा एकूण ३८९  निजामकालीन शाळांच्या इमारतींच्या पुनरुज्जीवन कामासाठी राज्य शासनाने सुमारे ३७  कोटी रुपयांची तरतूद केली असून, याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. या शाळांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केले.

बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ५ लाख ७१  हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्या सर्वांना शिक्षण देन्याबरोरबरच सामाजिक जाणिवांची भावना निर्माण करणाऱ्या व आदर्श शिक्षकांचा सन्मान करणे भाग्याचे आहे असेही पालकमंत्री धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

या समारंभात जिल्ह्यातील ११  प्राथमिक, १०  माध्यमिक व एका विशेष शिक्षकाचा सहकुटुंब आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी श्री. मुंडे यांच्या सह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, आमदार संदीप भैय्या क्षीरसागर, संजयभाऊ दौंड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांसह अधिकारी, पदाधिकारी व सत्कारमूर्ती शिक्षक सहपरिवार उपस्थित होते.

कोविड मधील योगदान जिल्हा विसरणार नाही

बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षणाचे धडे देण्याबरोबरच बीड जिल्हा प्रशासनाच्या बरोबरीने कोविड व्यवस्थापनामध्ये मोलाचे योगदान दिले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये सुरुवातीपासून बीड जिल्हा विभागात अव्वल होता, त्याचे संपूर्ण श्रेय जिल्ह्यातील शिक्षकांचे आहे. त्यांचे कोविड व्यवस्थापनातील योगदान बीड जिल्हा कधीच विसरणार नाही, अशा शब्दात पालकमंत्री श्री.मुंडे यांनी शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले.

हे ठरले आदर्श शिक्षक…

प्राथमिक विभागातून श्रीमती अनिता हरिश्चंद्र, अप्पा झिंजुके, श्रीमती मूनव्वर शेख, तानाजी लासुने, गंगाराम शिंदे, श्रीमती ज्योती शिंदे, ताहेरखान पठाण, अंकुश फड, अशोक पवार श्रीमती मंगल नागरे, हरिदास सोळंके तसेच माध्यमिक विभागातून चंद्रकांत कवडे, सतीश दळवी, पोपट गोसावी, शंकर इंगोले, लहू चव्हाण, महादेव क्षीरसागर, पांडुरंग राठोड, श्रीमती अनिता गर्जे, बबन घायाळ, प्रताप काळे आणि श्रीमती मंगल समुद्रे या विशेष शिक्षिका यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

समाजाचा ईश्वरावर जितका विश्वास तितकाच शिक्षकांवर

विशेषकरून ग्रामीण भागात पालकांचा शिक्षकांवर प्रचंड विश्वास असतो, समाजाचा जितका विश्वास ईश्वरावर आहे अगदी तितकाच विश्वास समाज शिक्षकावर व्यक्त करतो. तो विश्वास जपणे ही आपली जबाबदारी आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती बजरंग बप्पा सोनवणे यांनी केले, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवकन्या सिरसाट यांनीही आपले मनोगत व्यक्त करत पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

शिक्षण विभागाच्या वतीने दाखविण्यात आलेल्या चित्रफितीचे पालकमंत्री महोदयांनी केले कौतुक

कार्यक्रमाच्या प्रास्तविक भाषणात शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी यांनी गुरूतत्वाचा हा सत्कार आहे. मुलांसाठी झटणाऱ्या शिक्षकांचा प्रातिनिधीक सत्कार आहे असे सांगून विविध उपक्रमाची माहिती दिली.

यावेळी पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते ११  प्राथमिक, १०  माध्यमिक आणि १  विशेष अशा २२  शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्वागतगितानंतर शिक्षण विभागाच्या वतीने दाखविण्यात आलेल्या चित्रफितीचे पालकमंत्री महोदयांनी कौतुक केले.

प्रारंभी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा शिक्षण विभागाच्या वतीने उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांनी सत्कार केला.  आ.संदीप क्षीरसागर यांचा शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी तर आ.संजय दौंड यांचा सत्कार डॉ.विक्रम सारूक यांनी केला. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व  मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार प्रभारी उपशिक्षणाधिकारी अजय बहीर   यांनी केला. जि.प. अध्यक्षा .शिवकन्या सिरसाट यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी केला. तर उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांचा सत्कार प्रभारी उपशिक्षणाधिकारी सोनवणे यांनी केला.  यावेळी उपस्थित शिवाजी सिरसाट यांचा सत्कार गौतम चोपडे यांनी तर नारायण शिंदे यांचा सत्कार हिरालाल कराड यांनी केला. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन ज्ञानेश्‍वर काशिद यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. विक्रम सारूक यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *