माजलगांव येथील पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
बीड, दि. १९ : भारतीय स्वातंत्र लढ्याचा इतिहास उपलब्ध आहे त्याच धर्तीवर मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
माजलगांव येथील पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री श्री.मुंडे यांच्या हस्त झाले. याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन समारंभास आमदार प्रकाश दादा सोळंके, आमदार संदीप शिरसागर, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवकन्या शिरसाठ, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जि.प.बांधकाम सभापती जयसिंग सोळंके, जि.प.सभापती कल्याण आबुज, माजलगाव पंचायत समिती सभापती सोनाली नवले, गटविकास अधिकारी एस जी हजारे, श्री अशोक डक, नगराध्यक्ष शेख मन्सूरचाँद साहेब, श्री राधाकृष्ण होके पाटील, श्री बाबूराव पोटभरे यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, सध्या आपण कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात आहोत तरीदेखील सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेत राज्य सरकारने निधी कमी पडू दिला नाही. यातूनच आपत्तीच्या काळात देखील माजलगाव मध्ये विकासाची अनेक काम देखील झाली आहेत. असे मंत्री श्री.मुंडे म्हणाले.
आमदार प्रकाश सोळंके यांचे विकासात महत्त्वाचे योगदान
पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि स्वर्गीय सुंदरराव सोळंके यांचा स्मृतिदिन आहे या महत्त्वाच्या दिवशी हा लोकार्पण सोहळा झाला. यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांचे विकासात महत्त्वाचे योगदान आहे. आमदार सोळंके यांची सुरुवात पंचायत समिती सदस्य पदापासून सुरू झाली त्यानंतर ते राज्यात राज्यमंत्री देखील झाले त्यांचा अनुभव आणि विकास कामांची सुरुवात पंचायत समिती मधूनच झाली. ते सतत विकासासाठी पाठपुरावा करून विकास घडवत आहेत. येथे नगर परिषदेचे सिमेंट रस्ते कोरोना काळात झाले. माजलगाव येथे नाट्यग्रहासाठी ५ कोटी रु. निधीची मंजूरी आणि माजलगाव एम.आय.डी.सी. सह विकासाची अनेक काम होत आहेत.
मंत्री महोदय म्हणाले, माजलगाव हा सधन तालुका आहे. यासाठी माजलगाव धरण महत्त्वाचे ठरले असून या धरणास सुंदर सागर असे नामकरण करून येथे चांगले उद्यान विकसित करण्यासाठी निर्णय घेण्यात येईल. बीड जिल्ह्यातील नवीन जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत आणि सर्व नवीन पंचायत समिती इमारतींमध्ये साधनसामग्री फर्निचर यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ असे त्यांनी आश्वासित केले.
ते म्हणाले, आता सर्वात जास्त ऊस उत्पादन बीड जिल्हा जिल्ह्यात होते तेव्हा येथील सर्वात जास्त मजूर ऊस तोडणी साठी इतर जिल्ह्यात जातो. बीड जिल्ह्यास हक्काचे पाणी मिळवून देऊ यातून येथील दुष्काळ पुसून टाकण्यास मदत होईल असे मंत्री श्री.मुंडे यांनी सांगितले.
आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, तालुक्यातील गोरगरीब सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम पंचायत समितीच्या माध्यमातून घडत असते. सामान्य माणसाला येथे आल्यानंतर विश्वास वाटला पाहिजे. या पंचायत समितीच्या नवीन इमारती मधून विश्वासाने सामान्य माण्साचे काम व्हावे. तसेच योजनांचे उदि्दष्ट १०० % साध्य करण्याचे काम व्हावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पं.स.सभापती सोनाली खुळे यांनी केले. तसेच सभापती जयसिंग सोळंके आणि विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि मंत्री महोदयांच्या हस्ते कोनशिला अनावरण करुन व फित कापून नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीच्या विविध योजनातील लाभार्थ्यांना पालकमंत्री श्री.मुंडे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यामध्ये सुनील राठोड व मनीषा राठोड या दांम्पत्यास आणि प्रशांत थिटे यांचा सत्कार करण्यात आला.