औरंगाबाद, दिनांक ३ : सिल्लोड तालुक्यातील नागरिकांना एकाच छताखाली सुविधा देण्याबरोबरच प्रशासकीय कामात अद्यावतपणा आणण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा उपयोग होईल असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी इमारतीच्या भुमिपूजन व कोनाशिलाचे अनावरण प्रसंगी व्यक्त केला.
यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, नगर अध्यक्षा राजश्री निकम, सिल्लोडचे तहसीलदार विक्रम राजपूत, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. मराठे, कार्यकारी अभियंता येरेकर, सिल्लोड नगरपालिका मुख्याधिकारी सय्यद रफीक यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमुळे नागरिकांना विविध विभागाचे कार्यालय एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे असेही पालकमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले.
सिल्लोड मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी १० कोटी ४३ लाख रूपयाचा निधी मंजूर झाला असून १६ महिन्यात या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. ही इमारत एकूण २ हजार ५०० चौरस मिटर जागेत २ मजली इमारत आहे यामध्ये तहसिल कार्यालय, मोजणी कार्यालय तसेच नोंदणी कार्यालय आणि तालुका कृषी कार्यालय याचा समावेश असणार आहे.