कोल्हापूर, दि. १३ : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त २५ वा राष्ट्रीय युवा महोत्सव आणि कोविड १९ लसीकरण या विषयावर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या फिरते ऑटोरिक्षा प्रचार प्रसार मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते व कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आला.
यावेळी क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूर विभागाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, माहिती उपसंचालक कार्यालयाचे सहायक संचालक फारूख बागवान, माहिती सहायक एकनाथ पोवार उपस्थित होते.
माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्यावतीने हे उपक्रम आज राज्यातील एकूण ११ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूरच्यावतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त २५ वे राष्ट्रीय युवा महोत्सव आणि कोविड १९ लसीकरण या विषयावर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात फिरते ऑटोरिक्षाद्वारे प्रचार प्रसार मोहीम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत कोव्हिड लसीकरणाबाबतची माहिती, आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर महापुरूषांची माहिती लोकांना देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय युवा महोत्सवांतर्गत युवकांच्या मनात महापुरूषांची प्रेरणा रूजविण्याचे कार्य, तसेच सक्षम भारताची निर्मिती करण्यासाठी युवकांमध्ये राष्ट्र प्रेमाविषयी जनजागृती निर्माण करणे, जगात भारताचे नाव पुढे नेण्यासाठी नव युवकांद्वारे करण्यात येणारे विविध नवनवीन प्रयोग, विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करून देशाचे नाव उज्वल करण्यासाठी प्रेरीत करण्याकरीता जिल्ह्यातील युवकांमध्ये जनजागृती निर्माण केली जात आहे.
मोहिमेला उपसंचालक माहिती कार्यालय, कोल्हापूर आणि जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर यांचे सहकार्य लाभले आहे.
मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुण्याचे संचालक प्रकाश मकदुम, उपसंचालक निखील देशमुख यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापुरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, एन.डी. नाळे, विलास शेणवी परिश्रम घेत आहेत.