अजित पवार यांचं पांडुरंगचरणी साकडं

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून बा पांडुरंगाच्या आणि माता रुक्मिणीच्या चरणी वंदन.

मुंबई, दि. २० :- आषाढी एकादशीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरच्या बा पांडुरंगाच्या, माता रुक्मिणीच्या चरणी वंदन केलं असून समस्त वारकरी बांधवांना, राज्यातील नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “यंदा राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊदे. माझ्या राज्यातला बळीराजा सुखी होऊदे. त्याच्या शेतशिवारात, घराघरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊदे. बा पांडुरंगा, जगावर आलेलं कोरोनाचं संकट लवकर दूर कर. सर्वांना निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी ठेव”, असं साकडंही उपमुख्यमंत्र्यांनी बा पांडुरंगाच्या आणि माता रुक्मिणीच्या चरणी घातलं आहे.

आषाढी एकादशीनिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राची संतपरंपरा, पांडुरंगभक्तीचा वसा आणि वारसा पुढे नेणाऱ्या तमाम वारकरी माऊलींनाही वंदन केलं आहे. समाजातले सगळे भेदाभेद नष्ट करुन, बा पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं, सर्वांना एकत्र, समानतेच्या पातळीवर आणणारी पांडुरंगभक्तीची, पंढरपूरवारीची परंपरा आपलं आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभव आहे. हे वैभव सांभाळून पुढच्या पिढीकडे द्यायचं आहे. बा पांडुरंगाच्या कृपेनं कोरोनाचं संकट लवकरच संपेल आणि आपण सर्वजण वारीनं पंढरपूरला जाऊ शकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *