निफाड तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न
नाशिक प्रतिनिधी. १९ – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरीही धोका अजून टळलेला नाही. प्रत्येकाने स्वत:चे व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. विकास हा जनतेसाठी असून, नागरिकांचे आरोग्य जपत विकास साधणार, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
निफाड येथील गाजरवाडी येथे आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयदत्त होळकर, निफाडचे तहसिलदार शरद घोपरडे, गटविकास अधिकारी संदिप कराड, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता अर्जून गोसावी, शाखा अभियंता गणेश चौधरी, गाजरवाडीचे सरपंच प्रकाश दराडे, शिरवाडेचे सरपंच डॉ. श्रीकांत आवारे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, कोरोना काळात विकासकामांवर मर्यादा होती. परंतु आता अर्थचक्र गतिमान होत असून, परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विकासकामांसाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून जलदगतीने थांबलेली विकासकामे निश्चितच पूर्ण केली जात आहेत. कोरोना काळात आरोग्यविषयक सेवांना प्राधान्य देण्यात आले आहे. आज ऑक्सिजनच्या बााबतीत जिल्हा स्वयंपूर्ण झाला असून ४५० मेट्रीक टन ऑक्सीजन उपलब्ध आहे. आगामी लाटेच्या अनुषंगाने ७५० मेट्रीक टन ऑक्सिजनची उपलब्धता सुध्दा त्वरीत होऊ शकेल यासाठी जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये ऑक्सीजन निर्मिती युनिट तयार केले गेले आहेत, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथील या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
निफड तालुक्यातील गाजरवाडी येथील प्रमुख जिल्हा मार्ग ६९ गाजरवाडी धारणगाव रस्ता प्रजिल्हा मार्ग किमी १८/३०० ते २२/२०० ची सुधारणा करणे ता. निफाड जि नाशिक कामाचे भूमिपूजन (रु.३५० लक्ष), निफाड पंचायत समिती मधील निधीतून आदिवासी बस्तीत पाण्याची टाकीचे लोकार्पण (रु.७ लक्ष), “क” वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत बुवाजी बाबा मंदिर संरक्षण भिंत लोकार्पण करणे (रू. ८ लक्ष), १५ वा वित्त आयोग अंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण (रु.४.३७ लक्ष), जनसुविधा विशेष योजनेअंतर्गत स्मशानभूमी अनुषंगिक कामे (निवारा घोड बांधकाम ) (रु.१० लक्ष) आदी कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले.