विकास योजनांद्वारे नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी शासन कटिबद्ध – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुळा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन

अहमदनगर प्रतिनिधी, दि.१९ – पर्यावरणपूरक अत्याधुनिक प्रकल्प,

शेतकरी कर्जमुक्ती, महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा व अन्य विविध विकास योजनांद्वारे नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पर्यटन व पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे केले.

नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज कारखाना स्थळावर झाले. यावेळी आयोजित सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा उद्योग समूहाचे संस्थापक यशवंतराव गडाख होते. तर मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अहमदनगरच्या महापौर रोहणी शेंडगे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे कारखान्याचे संचालक, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले, मुळा सहकारी कारखान्याने उभारणी केलेला इथेनॉल आणि डिस्टीलरी प्रकल्प पर्यावरणपूरक असून याचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कोरोना काळात आवश्यक आरोग्यविषयक उपाययोजना करतानाच शासनाने मोठया प्रमाणावर विविध विकास कामे हाती घेतली असून ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. असेही मंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले.

मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज उद्घाटन करण्यात आलेला एक लाख लीटर क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाची क्षमता वाढवून दीड लाख लिटर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. असे सांगितले. याचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शासनाने सर्वसामान्य, शेतकरी व कष्टकरी यांच्यासाठी लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. जिल्हयातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव गडाख यांनी कारखान्याची क्षमता दीड हजार टनांवरुन दहा हजार टन केली असून यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. खासदार सदाशिव लोखंडे यांनी शासनाने उसाच्या रसापासून थेट निर्मितीची परवानगी द्यावी तसेच प्रत्येक तालुक्यात इथेनॉल प्रकल्प उभारावा.अशी सूचना केली.

कार्यक्रमाला कारखान्याचे सभासद, स्थानिक पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *