मुंबई प्रतिनिधी, दि. १९ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) दिवेआगर येथे २० व २१ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांची निवास व न्याहारी तसेच महाभ्रमण योजनेबाबतची कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनांची माहिती पोहचावी जावी या उद्देशाने येथे सहभागी होणाऱ्या इच्छुकांना या योजनांचे स्वरूप व त्याबाबतची माहिती दिली जाणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवास व न्याहारी तसेच महाभ्रमण या योजनांना आजवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, पर्यटन क्षेत्रात या उपक्रमांचे महत्त्व सिद्ध झाले आहे. ग्रामीण भागातील उद्योजकांना तसेच सामान्य जनतेला उत्पन्नाचा स्रोत म्हणून निवास व न्याहारी योजनेअंतर्गत नोंदणी करून आपली जागा, कक्ष किंवा निवास व्यवस्था पर्यटकांसाठी विविध सांस्कृतिक अनुभवांसह परवडणाऱ्या दरात प्रदान करता येते.
पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कुणबी समाज हॉल, दिवेआगर येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांच्या विशेष प्रयत्नाने आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यशाळेदरम्यान महामंडळाचे महाव्यवस्थापक दिनेश कांबळे हे या योजनांबाबत सादरीकरण करतील. तसेच महामंडळाच्या स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग संस्था व भविष्यातील जल पर्यटन प्रकल्प आदींबाबतचीही माहिती देतील.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात १ हजार ४८५ जणांनी निवास व न्याहारी योजनेचा तसेच १४४ जणांनी महाभ्रमण योजनेचा लाभ घेतला आहे. व्यावसायिक पात्रता प्रस्थापित करण्यासाठी या उपक्रमांतर्गत नवीन नाव नोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या स्थानिकांसाठी महामंडळामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या योजनांमुळे निवास व न्याहारी तसेच महाभ्रमण योजनेद्वारे स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण होत असून कमीत कमी गुंतवणुकीसह उत्पन्न कसे वाढवता येईल, याचेही प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे एमटीडीसीमार्फत कळविण्यात आले आहे.