अकोला,दि०१:- राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते महावितरणकडून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत उभारण्यात आलेल्या बाळापूर तालुक्यातील कळंबा(कसुरा), अकोट तालुक्यातील मुंडगाव व वडाळी(देशमुख) येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यास अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, कार्यकारी अभियंता पायाभुत सुविधा यामिनी पिंपळे, अधीक्षक अभियंता पवनकुमार खचोट तसेच अशोक अमानकर, डॉ. प्रशांत वानखडे, राजेंद्र तरवाडे, प्रमोद डोंगरे, महेंद्र गवई आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कोनशीला अनावरण करुन उपकेंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. आपल्या संबोधनात डॉ. राऊत म्हणाले की, रब्बी हंगामाच्या काळात अनेकदा शेतकरी बांधवांना कमी दाबाने विजेचा पुरवठा होतो. शेतकरी बांधवांची समस्या लक्षात घेउन महावितरणने उच्च दाब वितरण योजनेत अकोला जिल्ह्यासाठी आठ नवीन वीज उपकेंद्रांना मंजुरी दिली होती.
आपल्या भाषणात डॉ. राऊत यांनी सांगितले की, नवीन वीज उप केंद्रामुळे ३६ गावातील सुमारे ४ हजार वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. बाळापूर तालुक्यातील कळंबा कसुरा येथील वीज उपकेंद्रांमुळे कळंबा खुर्द आणि बुद्रुक, सोनगिरी, कसुरा या गावातील १४७५वीज ग्राहकांना लाभ होणारा आहे. तसेच कारंजा रंजनपूर वीज उपकेंद्राचा भर कमी होणार आहे. अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील वीज उपकेंद्रांमुळे मुंडगाव अमीनपूर, लोहारी बुद्रुक, लोहारी, चिंचखेड,नवरी खुर्द आणि बुद्रुक, आलेगाव,पिंपरी, डिक्कर, देवरी, देवरी फाटा, आलेवाडी, सोनबर्डी आदींसह २८ गावातील वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. या वीज उपकेंद्रांमुळे अकोट एमआयडीसी आणि अकोट १३२ कि. व्हो वीज उपकेंद्राचा भर कमी होणार आहे. वडाळी देशमुख येथील वीज उपकेंद्रांमुळे शिरसोली, मालपुरा आणि मालठाणा या गावातील वीज ग्राहकांना लाभ होणार असून सावरा आणि पणज वीज उपकेंद्राचा भर कमी होणार आहे.
ते पुढे म्हणाले की, गत दोन वर्षामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये ३८ कोटी रु चे उल्लेखनीय कामे करण्यात आली आहेत. कृषी जोडण्यांबाबत अकोला जिल्ह्यात विविध योजनांमध्ये २८४३ जोडण्या दिल्या आहेत. अनुसुचीत जाती व जमातीतील ग्राहकांना घरगुती वीज जोडण्या त्वरीत मिळाव्या या हेतुनेशासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने अंतर्गत २७६ वीज जोडण्या दिलेल्याआहेत,असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. राऊत म्हणाले की, ग्राहकांना वीज वितरण कंपनीने नेहमीच उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये सगळं जग थांबलं असतांना वीज कंपनीची सेवा अविरत सुरु होती. चक्री वादळासारख्या आपत्तीतही लवकरात लवकर सेवा पुर्ववत केली. मदत पुनर्वसन कार्याला वीज पुरवठा कमी पडू दिला नाही. कोळशाचे संकट निर्माण झाले, त्या काळातही भारनियमनाची झळ लागू दिली नाही. अशा वेळी ग्राहकांनी वीज वापरत असतांना त्याचे बिल भरावे, इतकीच माफक अपेक्षा आहे, केवळ वसुली हा उद्देश नाही, मात्र सेवेतील सातत्य राखण्यासाठी ग्राहकांनी बिल भरावे,असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात उपकेंद्रासाठी जमीन दिलेल्या शेतकरी गोपाळ केशवराव उगले यांचा डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर डॉ. राऊत यांचा कळंबा (कसुरा) सरपंच रामा ठाकरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला.