जिल्ह्याचा सर्वांगीन विकासासाठी शासन कटिबद्ध – आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

उस्मानाबाद,दि.१७ :- हैदराबाद संस्थान निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्याच्या लढ्याचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जिवितकार्याची पायाभरणी आपल्या जिल्ह्यातील हिपरग्याच्या राष्ट्रीय शाळेत झाली, याची आजच्या दिनानिमित्ताने आपल्याला आठवण येणे स्वाभाविक आहे.

 

स्वामीजींच्या नेतृत्वाखाली निजाम राजवटीच्या गुलामगिरीविरुध्द लढा देण्यात आला. त्यात आदरणीय गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, दिगंबरराव बिंदू, गंगाप्रसाद अग्रवाल, देवीसिंहजी चव्हाण, भाई उध्दवराव पाटील, दिगंबरराव देशमुख, कॅप्टन जोशी असे अनेक स्वातंत्र्य सैनिक सहभागी झाले होते, त्यांना महिला स्वातंत्र्य सैनिकांनीही या स्वातंत्र्य संग्रामात निडरपणे साथ दिली होती, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण आणि मराठवाडा मुक्ती स्मृती स्तंभास पुष्पचक्रही अर्पण डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अविनाश कोरडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

 

आपल्या जिल्ह्यातील देवधानोरा, नांदगाव, चिलवडी या गावांनी या मुक्तीसंग्रामात इतिहास रचला आहे. यात चिलवडीचे रामलिंग जाधव, देवधानोऱ्याचे महादेव बोंदर, लक्ष्मण बोंदर, उस्मानाबादचे भास्करराव नायगावकर, जिल्हा गौरव समितीचे अध्यक्ष नामदेवराव माने अशा सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आम्हाला सदैव जाणीव आहे. याही पुढे ही जाणीव राहील, असेही यावेळी डॉ.सावंत म्हणाले.

 

या मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आयुष्यभर क्रियाशील राहिले आहेत. केवळ स्वातंत्र्य मिळविणे एवढेच ध्येय समोर न ठेवता समग्र विकासाचा ध्यास त्यांनी धरला होता. तो ध्यास लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. ती जबाबदारी आपण सर्वजण पूर्ण करू या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राज्यात जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेत पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीमधून 90 कोटी 74 लाख 36 हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असून तालुकानिहाय संबंधित तहसिलदारांना वितरीत करण्यात येत आहे.तसेच सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील एक लाख 13 हजार 741 हेकटर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.त्यासाठी 154.79 कोटी निधीची मागणी करण्यात आली असून त्याबाबत शासनाकडे पाठपुराव चालू आहे, असे डॉ.सावंत यावेळी म्हणाले.

 

विशेष म्हणजे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषाच्या दुप्पट मदत देण्यात येत आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना (जिरायती) हेक्टरी ६ हजार ८०० रुपये प्रमाणे मदत एनडीआरएफच्या निकषानुसार दिली जाते. ही मदत आतापर्यंत दोन हेक्टरपर्यंत दिली जात होती आता तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. तसेच आमच्या सरकारने ही मदत आता दुप्पट केली आहे. यापुढे ही मदत हेक्टरी १३ हजार ६०० रुपये इतकी दिली जाणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ४० हजार ८०० रुपये इतकी मदत मिळू शकेल.

 

 

बागायत शेतकऱ्यांना बागायती शेतीसाठी १३ हजार ५०० रुपये प्रती हेक्टर प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई मिळत होती आता ती २७ हजार रुपये प्रती हेक्टरच्या प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत १८हजार रुपये प्रती हेक्टर प्रमाणे प्रचलित दर होता मात्र आता ३६हजार रुपये प्रती हेक्टर प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत मदतीचे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, अशीही माहिती डॉ.सावंत यांनी यावेळी दिली.

 

 

जिल्ह्यात आत्तापर्यंत लोकसहभागातून ८९६ रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहे.या रसत्यांची लांबी ९६५ कि.मी. असून त्यामुळे ३२ हजार ७९५ शेतक-यांना लाभ झाला आहे. जिल्ह्यामध्ये पी.एम किसान योजने अंतर्गत एकूण दोन लाख ७८  हजार ७८ शेतकरी लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून त्यांना या महिन्यात बारावा हप्ता दिला जाणार आहे. जिलह्यातील या लाभार्थी यांनी अद्यापही E-KYC केली नाही अशा शेतक-यांनी जवळच्या आपले सरकार केंद्रावर जाउन E-KYC करून घ्यावे, असेही डॉ.सावंत यांनी शेतकरी बंधूंना आवाहन केले.

 

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात मोठे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सेवा दिली जाणार आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदान आणि लढा याबाबत आजच्या व येणाऱ्या पिढीला माहिती असावी यासाठी स्वातंत्र्य सैनिकांची स्मरणिका लवकरच प्रकाशित केली जाणार आहे तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमांना व्यापक प्रसिध्दी देऊन सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले जाणार आहे, असेही डॉ.सावंत यावेळी म्हणाले.

 

 

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे स्मारक व तालुक्यातील करावयाचे स्मृती स्मारक महत्वाच्या ठिकाणी स्मृती स्तंभ उभारण्यात येणार आहे. याबाबत वास्तुविशारद, तालुक्यातील कलाकार, विद्यार्थी यांच्याकडून स्मृती स्मारकाचे संकल्पचित्र मागविण्यात आले आहे. प्राप्त संकल्प चित्रांमधून योग्य संकल्पचित्राची निवड करुन स्मृती स्तंभ उभारण्यात येणार आहे, अशीही माहिती यावेळी आरोग्य मंत्र्यांनी दिली.

 

सोलापूर-धुळे महामार्गावरील डोंगरावर मुक्ती संग्रामाशी संबंधित शिल्प कोरने शक्य आहे का ? याची विभागीय आयुक्त यांच्याकडून चाचपणी होणार असून विभागातील सर्व जिल्हाधिकारी याबाबत प्रयत्नशील आहेत तसेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही सहभागी करुन घेण्यात येणार आहे. या कालावधीत शाळांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मॅरेथॉन, प्रभात फेरी आणि इतर शैक्षणिक उपक्रमांच्या आयोजनाबरोबरच मुक्ती संग्रामाविषयी पुस्तक प्रदर्शने, मान्यवरांचे व्याख्यान आयोजित करुन नवयुवकांना या स्वातंत्र्य लढ्याबाबत अवगत केले जाईल. आपल्या जिल्हयाचा सर्वांगीण विकास जलद गतीने व्हावा, यासाठी आपण सर्वजन कटीबद्द होऊ, असे आवाहन डॉ.सावंत यांनी यावेळी केले.

 

यावेळी कर्नाटकातील गुलाबर्ग्यातील अवैधरित्या चालू असलेले गर्भलिंग निदान चाचणी केंद्रावर यशस्वी कार्यवाही केल्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील तसेच ॲड.रेणुका शेटे यांचाही सत्कार डॉ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

 

 

यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालय कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवनात भरविण्यात आलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम व त्याच्याशी संबंधित विविध पुस्तकांचे आणि ग्रंथाच्या पद्रर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे, त्याअनुषंगाने जिल्ह्यात मंडळस्तरीय महसूल विषयक सेवांच्या शिबीराचे उद्घाटनही डॉ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.सावंत म्हणाले की, या पंधरवड्यात झिरो पेंडंसीचा अवलंब करुन सर्व प्रलंबित कामे,प्रकरणे निकाली काढावीत. आपल्या कामातून समाजाला समाधान मिळावे या हेतूने गतीशील काम करुन जनसामान्यांचे कल्याण होईल याची दक्षता घ्यावी.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *