‘हर घर तिरंगा’ अभियानात कार्यालयासह नागरिकांनी सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

तिसऱ्या टप्पा  13 ते 15 ऑगस्ट कालावधीत .

नांदेड दि.12 :- शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे “हर घर तिरंगा” हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शेवटचा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आयोजित केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात प्रत्येक घरावर, सर्व शासकीय कार्यालये, खासगी आस्थापनांवर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

या कालावधीत प्रत्येक घरावर, कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकविणे अभिप्रेत आहे. त्या दृष्टिकोनातून संबंधित विभाग, कार्यालयांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आली. या बैठकीस विविध विभागाचे तालुका व जिल्हास्तरावरील अधिकारी उपस्थित होते.

 

 

“हर घर तिरंगा” अभियानांतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत केंद्र व सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात विविध कार्यक्रम, उपक्रम हाती घेऊन हे अभियान उत्साहात यशस्वी साजरा करण्याची कार्यवाही सर्व कार्यालय प्रमुखांनी करावी.

 

 

 

जिल्ह्यातील प्रमुख शासकीय महत्त्वाची स्थळे, पाणीसाठे आणि वारसास्थळे या ठिकाणी तिरंगा रोषणाई व स्वच्छता करण्याची सूचना यावेळी देण्यात आली. या अभियानाची अधिक माहिती, स्वयंसेवक नोंदणी, सेल्फी अपलोड करण्यासाठी व तपशीलवार माहितीसाठी नागरिकांनी https://harghartiranga.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.