- नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
- मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लाख रुपयाची मदत
नांदेड दि. २० ऑगस्ट :- राज्यात मागील ४ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी शिरले. या गावांमध्ये मोठ्याप्रमाणात जनावरांचे नुकसान होऊन ५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसानही झाले आहे.
या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानग्रस्त गावातील नागरिकांना शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा (विदर्भ, ताणी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. यावेळी मृत्तांच्या वारसदारांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत धनादेश स्वरुपात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे दौऱ्यावर आले. त्यांनी मुखेड तालुक्यातील हसनाळ या गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन येथील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. तसेच मारजवाडी या पुर्नवसीत गावालाही त्यांनी भेट देऊन तेथील गावकऱ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, परिसरातील शेतकरी, नागरिक आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार डॉ. तुषार राठोड यांनी या भागात पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती मंत्री गिरीश महाजन यांना दिली.
यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. त्यांच्या या समस्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्या सोडविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
तसेच या भागातील नुकसानग्रस्तांचा रोष जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर असल्याचे कळल्यानंतर याबाबत लवकरच चौकशी करुन दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
मृतांच्या वारसदारांना मदत
नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसदारांना यावेळी प्रत्येकी 4 लाख रुपयाची मदत धनादेश स्वरुपात आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते देण्यात आला. मृत्यू झालेल्या व्यक्ती व त्यांचे वारसदार याप्रमाणे आहेत. मृत्य व्यक्ती पिराजी म्हैसाजी थोटवे (वय ७०) त्यांचे वारस मारोती पिराजी थोटवे मुलगा. चंद्रकला विठ्ठल शिंदे (वय ३५) त्यांचे वारस विठ्ठल व्यंकटराव शिंदे पती.
ललिताबाई गोविंद भोसले (वय ६०) त्यांचे वारस मुलगा जगदीश गोविंद भोसले व मधुकर गोविंद भोसले. भीमाबाई हिरामण मादाळे (वय ६५) त्यांचे वारस संग्राम हिरामण मादाळे, राहुल हिरामण मादाळे मुले. गंगाबाई गंगाराम मादाळे (वय ६५) त्यांचे वारस मुलगी लालाबाई व्यंकट मादाळे यांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.