अपघातग्रस्तांना केंद्र व राज्य शासन सर्वोतोपरी मदत करणार – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिकदि. ११ :- यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसला शनिवारी झालेल्या अपघातात जखमी व मृतांच्या वारसांना केंद्र व राज्य शासन सर्वोतोपरी मदत करणार आहे. तसेच ब्लॅकस्पॉट बाबत तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहेत.

शनिवारी झालेल्या बस अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी डॉ. भारती  पवार यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर्स उपस्थित होते.

 

डॉ. भारती पवार म्हणाल्या की, रस्ता सुरक्षेसाठी संबंधित विभागाकडून सुरक्षा सप्ताह अंतर्गत  विविध कार्यक्रमांच्या व समितीच्या माध्यमातून  नियमांची सातत्याने जनजागृती करण्यात येत असते.

 

त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ब्लॅकस्पॉट असणाऱ्या ठिकाणी तात्काळ सुधारणा कराव्यात, असे निर्देश केंद्रीय रस्ते, वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील दिले आहेत.

 

केंद्र व राज्य शासनामार्फत वेळोवेळी याबाबत काळजी घेण्यात येत आहे. खाजगी बस कंपन्यांनी रस्ता सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असेही डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी गेल्यावर्षी निधी जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार मानसिक रुग्णांच्या मदतीसाठी केंद्र सरकार प्रत्येक राज्यासोबत काम करीत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मानसिक समुपदेशानाकरिता डॉक्टरांची टिम उपलब्ध आहे. मानसिक रुग्णांचे प्रमाण कोविड महामारीनंतर वाढल्याचे सर्वेक्षणातून समोर आल्याचे दिसते.

 

या मानसिक तणावातून रुग्णांना बाहेर काढण्‍यासाठी जास्तीत जास्त जनजागृती होणे, रुग्णांना समुपदेशन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच आपल्या देशाकडे योग विद्या व मेडिटेशनच्या बाबतीत जागतिकपातळीवर आदर्श म्हणून पाहिले जाते. योगविद्या व मेडिटेशनच्या माध्यमातून तणावमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मानसिक स्वास्थ्य चांगले राहणे ही सामुहिक जबाबदारी आहे.

 

मानसिक स्वास्थ्य चांगले राहिल्यास समाजाचा विकास देखील चांगल्या पद्धतीने होत असल्याने जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्याने प्रत्येकाचे मानसिक स्वास्थ्य निरोगी राहील यासाठी प्रयत्न करावेत, असेही  डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.

 

सुरवातीला डॉ. भारती पवार यांनी जिल्हा रुग्णालयातील अपघातग्रस्त रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *