चंद्रपूर-पुणे-चंद्रपूर या मार्गावर शिवशाही आसनी बससेवा १७ ऑक्‍टोबर पासून सुरू होणार

चंद्रपूर, दि. १६ ऑक्टोबर : चंद्रपूर-पुणे-चंद्रपूर या मार्गावर शिवशाही आसनी बससेवा दिनांक १७ ऑक्‍टोबर २०२२ पासून सुरू होत आहे. वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांनी ही बससेवा नागरिकांच्‍या व विद्यार्थ्‍यांच्‍या सेवेत रूजु होत आहे.

चंद्रपूर-पुणे-चंद्रपूर या मार्गावर एस.टी. महामंडळाच्‍या माध्‍यमातून बससेवा सुरू व्‍हावी, अशी मागणी नागरिकांनी व विद्यार्थ्‍यांनी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्‍याकडे केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत पालकमंत्र्यांनी म.रा. मार्ग परिवहन महामंडळाच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालकांशी संपर्क साधला व त्‍यांच्‍याशी पत्रव्‍यवहार केला. आठवडाभरातच म.रा. मार्ग परिवहन महामंडळाने ही शिवशाही आसनी बससेवा सुरू करण्‍याचा निर्णय घेतला.

सदर बस चंद्रपूर येथून पुणे करिता दुपारी ३.०० वाजता सुटणार असून परतीला पुणे येथुन चंद्रपूर करिता सायं. ६.०० वा. सुटणार आहे. या बसफेरीचा मार्ग चंद्रपूर-भद्रावती-वरोरा-वणी-यवतमाळ-कारंजा-वाशिम-मेहकर-जालना-संभाजीनगर-अहमदनगर-पुणे असा आहे. ही बससेवा सुरू होण्‍यामुळे प्रामुख्‍याने दिवाळीदरम्‍यान चंद्रपूर-पुणे प्रवास करणा-या पुण्‍यात अभ्‍यास व नोकरी करणा-या विद्यार्थ्‍यांना मोठी सोय उपलब्‍ध होणार आहे.

पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर-पुणे बससेवेबाबतची नागरिकांची, विद्यार्थ्‍यांची प्रलंबित मागणी पुर्णत्‍वास आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *