देगलूर प्रतिनिधी दि.१३ :- येथील प.पू.गोळवलकर गुरुजी प्रा. विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर आणि प्रमुख पाहुणे सहशिक्षक सचिन जाधव, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख सुरेखा तोटावार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
या निमित्त इयत्ता १ली ते ४थी चे विद्यार्थी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या वेषभुषेत आले. नंतर विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेचे परिक्षण स्मिता कुलकर्णी व सचिन जाधव यांनी केले. या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत कु. वैष्णवी प्रकाश देवकत्ते प्रथम क्रमांक चि. युवराज निलराज पाटील व कु. मृण्मयी राजाभाऊ कदम यांचा द्वितीय क्रमांक तर कु. पुनम शिंदे, कु. राजश्री पाटील या दोघांनी तृतीय क्रमांक मिळवला.
या सर्वाचे विद्यालयाच्या वतीने पुष्प देऊन गौरव करण्यात आले.अध्यक्षीय समारोपात देगावकर दमन यांनी राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास शेळके यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.