भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांचा कार्यकाल जून २०२४ पर्यंत वाढविण्याचा ठराव पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सर्वसंमतीने झाला. याचाच दुसरा अर्थ २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका होईपर्यंत नड्डाच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहणार आहेत.
त्यांनी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पक्ष संघटनेसाठी केलेल्या कामावर पक्षाने विश्वास दर्शवला आहे. नड्डा यांच्या अध्यक्षपदाची मुदत २० जानेवारीला संपणार होती. पण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची कमान त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ४०० दिवस उरले आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक मतदाराला भेटण्यासाठी त्याच्या दरवाजापर्यंत गेले पाहिजे, निवडणूक जिंकूच असा फाजिल आत्मविश्वास कोणी बाळगू नये.
लालकृष्ण अडवाणी व अमित शहा यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा पक्षाचे अध्यक्ष होण्याचा मान नड्डा यांना मिळाला आहे. राजनाथ सिंग हेही दोन वेळा पक्षाचे अध्यक्ष झाले, पण ते सलग झाले नव्हते. जे. पी. नड्डा हे २०१९ मध्ये पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष झाले. २० जानेवारी २०२० मध्ये ते पू्र्ण वेळ अध्यक्ष झाले.
त्यांची निवड सर्वसंमतीने झाली होती. त्यांच्या अगोदरचे अध्यक्ष अमित शहा यांची २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदाची मुदत वाढविण्यात आली होती.
भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० मध्ये झाली. १९८० ते १९८६ या काळात अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले संस्थापक अध्यक्ष होते.
१९८६ ते ९१ लालकृष्ण अडवाणी, १९९१ ते ९३ मुरली मनोहर जोशी, १९९३ ते ९८ लालकृष्ण अडवाणी, १९९८ ते २००० कुशाभाऊ ठाकरे, २००० ते २००१ बंगारू लक्ष्मण, २००१ ते २००२ जना कृष्णमूर्ती, २००२ ते २००४ वेंकय्या नायडू, २००४ ते २००६ लालकृष्ण अडवाणी, २००६ ते २००९ राजनाथ सिंह, २००९ ते २०१३ नितीन गडकरी, २०१३ ते २०१४ राजनाथ सिंह, २०१४ ते २०२० अमित शहा आणि २०२० पासून जे. पी. नड्डा पक्षाचे अध्यक्ष आहेत.
येत्या वर्षभरात नऊ राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसेच मे-जून महिन्यांत जम्मू-काश्मीरच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशा दहा राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच नड्डा यांच्या अध्यक्षपदाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
तांत्रिक बाबींचा विचार केला, तर सन २०२२ मध्ये भाजपमध्ये संघनात्मक निवडणुका होऊ शकल्या नाहीत. म्हणूनही जे. पी. नड्डा यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असावी.
भाजपच्या संविधानानुसार ५० टक्के म्हणजे देशातील निम्म्या राज्यांतील संघटनात्मक निवडणुका झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक घेता येते. म्हणजेच देशातील २९ पैकी १५ राज्यांत संघटनात्मक निवडणूक झाल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाते.
नड्डांना मिळालेल्या मुदतवाढीच्या काळात या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये दहा राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यात लोकसभेच्या २१ टक्के जागा आहेत.
सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका म्हणजे एक रंगीत तालीम ठरणार आहे. राजस्थानमध्ये लोकसभेच्या २५ जागा आहेत, मध्य प्रदेशमध्ये २९, छत्तीसगडमध्ये ११, कर्नाटकमध्ये २८, तेलंगणामध्ये १७, जम्मू-काश्मीरमध्ये ६, त्रिपुरा २, मेघालय २, नागालँड १ व मिझोराममध्ये १ अशा लोकसभेच्या जागा आहेत.
निवडणूक आयोगाने नागालँड, मिझोराम व त्रिपुरा येथे विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीरही केला आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नड्डा यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १२० निवडणुका लढविल्या त्यापैकी ७३ निवडणुका पक्षाने जिंकल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार तर झालाच तसेच पक्षाच्या यशात सातत्याने भर पडत राहिली.
२०२४ ची निवडणूक भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व नड्डा यांच्या संघटनात्मक नेतृत्वाखाली लढणार आहे. भाजपने देशात १ लाख ३० बूथवर संघटना मजबूत केली आहे.
इशान्येकडील राज्यात भाजपचा विस्तार झाला आहे. नड्डा यांच्या काळात पक्ष संघटन सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यास गती मिळाली.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हर घर तिरंगा ही मोहीम नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने देशपातळीवर राबवली व त्यातून देशभक्तीची भावना प्रबळ झाली.
भाजपची या पूर्वीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादला झाली होती. ज्या राज्यात विधानसभा निवडणूक आहे, त्या राज्यात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक न घेता पक्षाने दिल्लीत बैठक घेतली. बैठकीत मध्य प्रदेश व तेलंगणा या राज्यांच्या नावाची चर्चा अनेकदा झाली. या दोन राज्यांवर भाजप विशेष लक्ष केंद्रित करणार आहे, हे त्यातून संकेत प्राप्त झाले.
निवडणुका होऊ घातलेल्या ५ राज्यांत भाजप अथवा भाजप समर्थित सरकार आहे. २ राज्यांत काँग्रेसची सत्ता आहे. इतर दोन राज्यांत अनेक प्रादेशिक सरकारे आहेत. मध्य प्रदेश, कर्नाटक, त्रिपुरा या तीन राज्यांत भाजपचे सरकार आहे. मेघालय व नागालँडमध्ये भाजप समर्थित सरकार आहे. जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेश आहे. राजस्थान व छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तेलंगणामध्ये टीआरएस तर मिझोराममध्ये मिझो नॅशनल पार्टीचे सरकार आहे.
दहा राज्यांतील निवडणुका व २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक यांची तयारी असाच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत माहोल होता. सर्व राज्यांत निवडणुका जिंकण्याचा निर्धार बैठकीत प्रकट करण्यात आला. निवडणूक रणनिती आखणे, राज्या-राज्यांत प्रभारी पाठवणे, असा आराखडा करण्यात पक्षाचे वरिष्ठ गुंतले आहेत. दुसरीकडे काँग्रेस पक्ष सुस्तावलेला आहे.
काँग्रेसची सारी यंत्रणा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतच गुंतली आहे. वर्षभरातील १० राज्यांतील विधानसभा निवडणुकींचा विचार करायला काँग्रेसच्या धुरिणांना अजून फुरसत मिळालेली नाही. काँग्रेस पक्षाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर कमान सोपवली आहे. राहुल गांधी भारत जोडोमध्ये मश्गूल आहेत. भारत जोडो यात्रेतून पक्षाला किती संजीवनी मिळेल हे काळच ठरवेल, पण भाजपची निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे.
या वर्षी होणाऱ्या दहा राज्यांतील सर्वच्या सर्व विधानसभा निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत, असा निर्धार नड्डा यांनी बोलून दाखवला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या विजयाची ही नांदी ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे. जसे भाजपने गुजरातची सत्ता सलग २७ वर्षे आपल्याकडे ठेवली आहे, तसेच भरघोस यश भाजपला २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत मिळवायचे आहे.
याचा दुसरा अर्थ भाजपला २०१९ मध्ये लोकसभेत ३०३ जागा मिळाल्या होत्या, त्याहीपेक्षा जास्त जागा जिंकण्याचे टार्गेट भाजपने ठरवले आहे. २०१९ पेक्षा नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा भाजपने निश्चय केला आहे.नड्डांच्या कारकिर्दीत त्यांचे गृहराज्य असलेल्या हिमाचल प्रदेशात भाजपला सत्ता गमावावी लागली, याची खंत त्यांना व पक्षाला आहेच. हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.
भारत जोडो यात्रा एक दिवसही हिमाचलमधून गेली नाही, तरी काँग्रेसला हे यश लाभले. भाजपला काँग्रेसपेक्षा केवळ एक टक्का मते कमी पडली. काँग्रेस व भाजप यांना मिळालेल्या मतांमध्ये केवळ ३७ हजारांचा फरक आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जनता दल युनायडेट हे तीन मित्र पक्ष भाजपला सोडून गेले, पण भाजपची भरारी ते रोखू शकलेले नाहीत; किंबहुना भाजपची साथ सोडल्यावर या तिन्ही पक्षांची होणारी फरफट बघायला मिळते आहे.
स्टेटलाइन – डॉ. सुकृत खांडेकर
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in