स्व. पै. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचे धुळ्यात २१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान आयोजन

 

 

धुळे, दि. ०६ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. पै. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचा मान धुळे जिल्ह्यास मिळाला आहे. ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याने या स्पर्धेचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे नियोजन करावे. अशा सूचना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या.

स्व. पै. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा धुळ्यात २१ ते २५ फेब्रुवारी, २०२३  दरम्यान गरुड मैदानावर होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजन समितीची बैठक पालकमंत्री श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली काल  दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते.

 

 

 

 

 

या बैठकीस खासदार डॉ सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक संजय सबणीस, नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक श्रीमती सुनंदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, शिक्षणाधिकारी माध्यमिक मोहन देसले, अनुप अग्रवाल, उमेश चौधरी, सुनील चौधरी, कमलाकर अहिरराव, राष्ट्रीय खेळाडू महेश बोरसे आदि उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

पालकमंत्री पुढे म्हणाले की, धुळे जिल्ह्याला कुस्तीची परंपरा लाभली असून ती अजतागायत सुरु आहे. धुळ्यातील मल्लांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजविल्या आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हावासियांना एक आनंदाची पर्वणी राहणार असल्याने या स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. या स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व समित्या तातडीने गठीत करुन कामांचे वाटप करण्याच्या सुचनांही त्यांनी दिल्यात.

 

 

 

 

 

 

स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा २१ ते २५ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत गरुड मैदान, धुळे येथे संपन्न होणार आहेत. ही स्पर्धा फ्री स्टाईल, ग्रीको रोमन व मुलींचा संघ अशा प्रत्येकी दहा वजनगटात तीस संघ सहभागी होणार आहे. प्रत्येक संघात ७ खेळाडू, १ क्रीडा मार्गदर्शक व १ व्यवस्थापक असा एकूण ९ जणांचा समावेश राहील.

 

 

 

 

 

या स्पर्धेत ३६० वरिष्ठ कुस्तीगीर, १०० पंच व पदाधिकारी तसेच ५० स्वयंसेवक व समिती सदस्य असे एकूण ६५० जण सहभागी होणार आहेत. या स्पर्धा तीन पोडियममध्ये मॅटवर लावण्यात येणार आहेत. या स्पर्धेत एकूण ३१ लाख २० हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

 

 

 

 

 

त्याचबरोबर या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडू व इतर यांची भोजन, निवास, प्रवास खर्च देण्यात येणार असून प्रेक्षकांसाठी गरुड मैदानावर प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार असल्याचे क्रीडा उपसंचालक श्रीमती सुनंदा पाटील यांनी सांगितले. स्पर्धेचे प्राथमिक नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी बैठकीत दिली.

 

 

 

 

 

 

या स्पर्धेच्या आयोजनासाठी धुळे शहर महानगरपालिका, धुळे जिल्हा तालीम संघ तसेच स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचेही सहकार्य लाभणार आहे. बैठकीत उपस्थित मान्यवरांनी विविध उपयुक्त सुचना मांडल्या. या सुचनांवर कार्यवाही करण्याचे पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.

 

तत्पूर्वी पालकमंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते स्व. पै. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *