ऑक्सिजन साठयाचे काटेकोर नियोजन करा – अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे

अमरावती, दि. २० : कोरोनाच्या संभाव्य तीसऱ्या लाटेचा धोका ओळखून प्राणवायू व औषधींची कमतरता भासणार नाही यासाठी काटेकोर नियोजन करुन त्याप्रमाणे अनुषंगिक बाबींची आताच तजवीज करावी, असे सुस्पष्ट निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी संबंधित विभागाला दिले.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा मंत्री श्री. शिंगणे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. सह आयुक्त सुरेश अन्नापुरे, सहा. आयुक्त (औषधी) उमेश घराटे, औषधी प्रशासन निरीक्षक मनीश गोटमारे यांच्यासह विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री. शिंगणे म्हणाले की, कोरोनाच्या संभाव्य तीसऱ्या लाटेचा धोका ओळखून विभागात ऑक्सिजन व कोरोना संबंधीची औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध असला पाहिजे. यासाठी मागील वर्षीच्या उच्चतम ॲक्टीव्ह रुग्णसंख्येच्या दिडपट रुग्णसंख्येला जेवढा ऑक्सिजन लागेल त्या हिशोबाने ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी काटेकोर नियोजन करावे. ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णांचा मृत्यू होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक औषधींचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध ठेवावा. औषधींचा काळाबाजाराला आळा, व औषधी नियंत्रणाचे काम विभागाने जाणीवपूर्वक करावे.

कोरोनाच्या संभाव्य तीसऱ्या लाटेच्या अनुषंगाने विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यांना लागणारे ऑक्सिजनची आवश्यकता, रेमडेसीव्हीअर व इतर आवश्यक औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. त्यासाठी आताच नियोजन करुन त्याप्रमाणे आवश्यक बाबींची तजवीज जिल्ह्यात करावी. पीएसएफ प्लाँटच्या माध्यमातून किती मे.टन ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकते याची खात्री करावी. तीसऱ्या लाटेचा धोका पाहता आणखी किती ऑक्सिजन जिल्ह्याला लागणार याचे अचूक नियोजन करुन ऑक्सिजन प्लाँटची निर्मितीच्या प्रक्रियेसाठी कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी विभागाला दिले.

तीसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक बाधा होणार असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविले आहे. त्यानुसार जिल्ह्यात शासकीय तसेच खासगी रुग्णालयात लहान मुलांसाठी ऑक्सिजन सुविधेसह चाईल्ड केअर सेंटरची निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाशी समन्वय ठेऊन उपाययोजना कराव्यात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *