अमरावती प्रतिनिधि,दि.२० : गुटखा सेवनाने कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन अनेकांचे संसार उध्दवस्त झाले आहेत. सुंगधीत सुपारी, गुटखा, मावा विक्री तसेच खाद्य तेल व पदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीच्या प्रकरणांत दोषींवर भादंविच्या कलम २५ तसेच कलम ३२८ अन्वये कारवाई करण्याचे विभागाला अधिकार प्रदान करण्यात आले आहे. त्यानुसार धाड सत्र राबवून गुटखा विक्रीच्या व भेसळीच्या कारवाईंना गती द्यावी असे आदेश अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यानी दिले.
यावर्षी औषधींच्या फसव्या जाहिरातींच्या प्रकरणांत ४३ व्यक्तींना नोटीस बजावून १० लक्ष रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. खाद्य पदार्थांमध्ये भेसळ, लूज ऑईल, शीत गोड पदार्थ, गोड मका आदींच्या प्रकरणांत दोषींवर कारवाई करुन ५१ लक्ष रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती, अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त श्री. अन्नापुरे यांनी मंत्री महोदयांना दिली. यापुढेही विभागाव्दारे गुटखा विक्री व इतर अन्न पदार्थांमध्ये भेसळ, फसव्या औषधांची विक्री आदी बाबींवर लक्ष केंद्रीत करुन उत्तम कामगिरी केल्या जाईल, असेही त्यांनी सांगितले.