कृषी स्नातकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात क्रांती आणावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. ०३ : भारत अन्नधान्य उत्पादन, दुग्ध उत्पादन व मत्स्य उत्पादनांच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदार देखील झाला आहे. कृषी क्षेत्रांत नैसर्गिक शेती, पेटेंट, भौगोलिक मानांकन यांमुळे शेतकऱ्यांसाठी समृद्धीची नवनवी दालने उघडत आहेत. अश्यावेळी कृषी स्नातकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा ३९ वा पदवीदान समारंभ राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत झाला, त्यावेळी राजभवन येथून सहभागी होताना ते बोलत होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, प्राचीन काळापासून भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी व कृषीवर आधारित उद्योग, फलोत्पादन यांमुळे देश संपन्न आहे. मधल्या काळात देशाने अनेक दुष्काळ पहिले. नंतरच्या काळात हरित क्रांती आली. अलीकडच्या काळात धवल क्रांती व नील क्रांतीच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. ‘उत्तम खेती, मध्यम बान, निकृष्ट चाकरी, भीख निदान’ या जुन्या काळातील प्रचलित म्हणीचा दाखला देऊन राज्यपालांनी युवकांना कृषी क्षेत्रात येण्याचे आवाहन केले.

कृषी विद्यापीठांमध्ये नवनवे संशोधन होत असून आपण नुकतेच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधन पाहून आल्याचे राज्यपालांनी सांगितले. या संशोधनामुळे आपण प्रभावित झाल्याचे सांगून हे संशोधन प्रयोगशाळेतून शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

भारतातील सामान्य शेतकऱ्याकडे देखील शेतीचे पारंपरिक ज्ञान असून कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांकडून देखील अनेक गोष्टी शिकल्या पाहिजे असे श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

यावेळी कृषिमंत्री व विद्यापीठाचे प्र-कुलपती दादाजी भुसे यांनी संबोधन केले तर कृषि वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांनी दीक्षांत भाषण दिले. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी विद्यापीठ अहवालाचे वाचन केले.

दीक्षांत समारोपात एकुण २०८७ स्नातकांना पदवी, पदविका, पदव्युत्तर व आचार्य पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी विशेष प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *