अतिवृष्टीग्रस्त भिलदरी धरण, नागद, सायगव्हाणची जयंत पाटील यांनी पाहणी केली

औरंगाबाद, दि. ०५ : अतिवृष्टीमुळे कन्नड तालुक्यातील फुटलेले भिलदरी धरण व परिसरातील अतिवृष्टीग्रस्त नागद व सायगव्हाण या गावांची जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी आज पाहणी केली.

कन्नड तालुक्यात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील भिलदरी हे धरण फुटल्याने परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर नागद व सायगव्हाण या गावाला लागून असलेल्या गडदगड नदीला पूर आल्याने नदीकाठाजवळील भागाचे नुकसान झाले. आज सकाळी श्री. पाटील यांनी प्रथम नागद गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी नदीकाठावर झालेल्या नुकसानीची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यानंतर त्यांनी सायगव्हाणला भेट दिली. या ठिकाणीही त्यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाची पहाणी करून लोकांना दिलासा  दिला. या भेटीनंतर भिलदरी गावातून दुर्गम भागात असणाऱ्या भिलदरी धरणाकडे श्री. पाटील हे मोटरसायकलीवरून पाहणीसाठी गेले. यावेळी प्रत्यक्ष भिलदरी धरणाच्या पात्रात उतरून त्यांनी धरणाच्या फुटलेल्या भागाची पाहणी केली.

पाहणी दरम्यान आमदार उदयसिंह राजपूत, आमदार सतिष चव्हाण, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड, जलसंपदा विभागाचे आधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटूळे, कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे, नागदचे सरपंच राजधर अहिरे, भिलदरीचे सरपंच संजय चव्हाण आदिंची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *