मुंबई, दि. ०५– बृहन्मुंबई महापालिका, शिक्षक, विविध स्वयंसेवी संस्था आदी सर्वांच्या सहभागातून महापालिका शाळांची मोठ्या प्रमाणात दर्जोन्नती आणि गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे. या शाळांमधील गळतीही कमी झाली असून आता प्रवेशासाठी मागणी वाढली आहे. येत्या काळात देशातील टॉप १० शाळांमध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या कमीतकमी ५ शाळांचा समावेश व्हावा यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
पेहले अक्षर फाउंडेशन आणि महापालिकेमार्फत शिक्षकांच्या प्रशिक्षणाची मोठी मोहीम राबविण्यात आली. यात सहभागी शिक्षकांना आज ऑनलाईन पद्धतीने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी पालकमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी महापालिका शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सहआयुक्त अजित कुंभार, शिक्षणाधिकारी राजू तडवी, पेहले अक्षर फाउंडेशनच्या संस्थापिका राधा गोयंका, प्रकल्प प्रमुख परिता शाह यांच्यासह प्रशिक्षणात सहभागी शिक्षक ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, काही वर्षापूर्वी महापालिका शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची गळती आता थांबत आहे. या शाळांची गुणवत्ता वाढ, शिक्षकांची प्रशिक्षणे, शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आल्याच्या परिणामस्वरुप महापालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी मागणी वाढली आहे. २०१३ मध्ये आपण व्हर्चुअल क्लासरुमची संकल्पना महापालिका शाळांमध्ये प्रत्यक्षात आणली. क्वॉलिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या सहभागातून या शाळांच्या दर्जोन्नतीसाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात आल्या. सीबीएसई, आयसीएसई बोर्डाशीही काही शाळांची संलग्नता करण्यात आली, त्याच पद्धतीने केंब्रिज बोर्डासमवेतही संलग्नता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये या शाळांचे शिक्षक, पेहले अक्षर फाउंडेशनसारख्या स्वयंसेवी संस्था यांचे महत्वपूर्ण योगदान राहीले आहे, असे त्यांनी सांगितले.
मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश असलेले जवळपास ४५ हजार टॅब वितरित करण्यात आले. याचाही विद्यार्थ्याच्या गुणवत्तावाढीत चांगला उपयोग झाला आहे. मनपाच्या अनेक शाळांनी क्रांतिकारक असा बदल केला आहे, त्यामुळे आता या शाळांमध्ये प्रवेश मिळावेत यासाठी पालक प्रयत्न करत आहेत. मनपा शाळेत प्रवेश वाढत आहेत. सर्वांच्या सहभागातून महापालिकेच्या सर्व शाळांचे याच पद्धतीने परिवर्तन करु, असे पालकमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.
शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी पेहले अक्षर फाउंडेशनमार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी कौतुक केले. या उपक्रमामुळे शिक्षकांची चांगल्या पद्धतीने क्षमता बांधणी झाली. त्यामुळे मनपा शाळांच्या गुणवत्तावाढीमध्ये त्याचा व्यापक उपयोग झाला, असे त्यांनी सांगितले.
पेहले अक्षर फाउंडेशनच्या संस्थापिका राधा गोयंका यांनी या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची आणि कामगिरीची माहिती दिली.