नागपूर, दि. १३ : मौदा तालुक्यातील तुमान व तरोडी गावांत विज पडून एक महिला मृत व अन्य गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी आज त्यांच्या कुटुंबियांचे भेट देऊन सांत्वन केले.
दु:खाच्या या प्रसंगात शासन आपल्या सोबत आहे. आपत्तीग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून योग्य ती मदत तातडीने देण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणांना दिले. यावेळी जिल्हा परिषदचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य, तहसिलदार रुपानी, तुळशीराम काळमेघ, पुरूषोत्तम राऊत यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते.
तरोडी येथील धानाच्या शेतात काम करणा-या महिलांवर ९ सप्टेंबर रोजी विज पडली. मेघगर्जनेसह पाऊस सुरू असतांना या महिला शेतात काम करत होत्या. काम थांबवत शेतातून लगबगीने परत येत असतांना विज पडली. त्यात तुमान येथील पुष्पा दुर्योधन बगडे (वय ४५ ) यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. बबीता अकीन गायकवाड (तुमान) तर प्रमिला घोडमारे, सुनिता कोंगे, वंदना हारोडे, सोनू घोडमारे (तरोडी) या जखमी झाल्या.
पु्ष्पा दुर्योधन बगडे यांना ऋषभ (वय १३ ) व श्रध्दा (वय ११ ) ही दोन मुले आहेत. मातृछत्र हरविल्यामुळे यांना नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्यामुळे ४ लाख रुपये मदत तर अन्य शासकीय योजनांमधून त्वरीत अर्थ सहाय्य देण्याविषयी मंत्री श्री. केदार यांनी यावेळी यंत्रणेला निर्देश दिले.
विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या प्रमिला घनश्याम घोडमारे यांच्या प्रकृतीची विचारपूस करुन त्यांना तातडीने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी तारसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने हलविण्यात आले. सुनिता कोंगे, वंदना हारोडे व सोनू घोडमारे यांच्या प्रकृतीचीही श्री. केदार यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला.
पावसाळयात विज पडण्याच्या घटना वाढत्या असून शेत-शिवारात काम करताना शेतकरी बांधवांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. आपत्तीच्या घटनांवर नियंत्रण नसले तरी आपत्तीग्रस्तांना तातडीने योग्य ती शासकीय मदत व उपचार याबाबत तालुकास्तरावरील यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
मेघगर्जना आणि वीज, वादळ असतांना काय करावे याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सूचना दिल्या आहेत. त्यानूसार तुम्ही घराबाहेर असाल, तर त्वरित आसरा शोधा, इमारत हा सुरक्षित आसरा आहे; पण इमारत नसेल तर तुम्ही गुहा, खडा किंवा खिंडीसारख्या भागात आश्रय घ्या. झाडे ह्यासाठी कधीच सुरक्षित नसतात. उंच झाडे स्वत:कडे विजेला आकर्षित करतात. तुम्हाला आसरा मिळाला नाही, तरी परिसरातील सर्वा उंच जागा टाळा. जर जवळपास फक्त उंच झाडे असतील, तर झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर थांबा, जमिनीवर वाका किंवा वाकून बसा. घरातच राहा किंवा बाहेर असाल, तर घरी जा ! जर वादळाची चाहूल लागली, तर अगदी गरजेचे नसेल तर बाहेर जाणे टाळा. लक्षात ठेवा विजेचा प्रकाश आणि आवाज ह्यातील अंतर जितके सेंकद असेल, त्याला तीनने भागले असता वीज ज्या ठिकाणी कोसळली तिथपर्यंतचे अंतर किलोमीटरमध्ये अंदाजे कळू शकते. जेव्हा विजा चमकणे किंवा वादळ खूप जोरात चालू असेल, तेव्हा विजेच्या सुवाहक धुराडी, रेडिएटर्स, स्टोव्ह, धातूचे नळ, ओल्या जागा आणि टेलीफोन इत्यादींपासून दूर रहा. पाण्यातून तात्काळ बाहेर या, छोट्या नावेतून पाण्यातून जात असाल तरीही बाहेर या. जर तुम्हाला विद्युत भारित वाटत असेल, तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील; तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.
हे करु नका- विद्युत उपकरणे चालू करुन वापरु नका. जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली, तर तुम्हाला विजेचा धका बसू शकतो. वादळात टेलिफोनचा वापर टाळा. वीज टेलीफोनच्या घरावरील तारांमधुन वाहू शकते. बाहेर असताना धातूच्या वस्तूंचा वापर टाळा.