नवीन योजनांसंदर्भातील सुधारित आराखडा प्राधान्याने तयार करावा.

मुंबई, दि. २२ : जलजीवन मिशन अंतर्गत नवीन प्रस्तावित योजनांसंदर्भातील सर्व अंदाजपत्रक प्राधान्याने ऑक्टोबर २०२१ अखेर तयार करण्यात यावे, अशा सूचना  पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केल्या.

उदगीर आणि जळकोट तालुक्यातील जलजीवन अभियान व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कामांचा तसेच नागरी पाणीपुरवठा योजनांबाबतची आढावा बैठक मंत्रालयात पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला आमदार बाबासाहेब पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, जलजीवन अभियनाचे संचालक, ऋषिकेश यशोद, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, औरंगाबादच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री.बनसोडे म्हणाले की, नवीन योजना आणि रेट्रोफिटींग योजनांसंदर्भात अंदाजपत्रक तयार करीत असताना या योजना लवकरात लवकर कार्यान्वित कशा होतील याबाबत नियोजन करण्यात यावे. तसेच नवीन योजना लवकरात लवकर कशा सुरु होतील हे पाहणे आवश्यक आहे. याबाबत पुढील बैठक लवकरच औरंगाबाद येथे घेण्यात येईल.

वांजरवाडा हे लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने त्या गावासाठी जलजीवन अभियान मधून प्राधान्याने योजना आखण्यात यावी असेही आदेश राज्यमंत्री श्री.बनसोडे यांनी दिले.

तसेच लोणी  हळळी तोंडार या योजना तातडीने विशेष बैठक घेऊन शासनाकडे सादर करण्याचेही निर्देश दिले. मादलपूर व हेर गावांच्या योजना तातडीने १० दिवसात सादर करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.

उदगीर, जळकोट तालुक्यासाठी सविस्तर वेगळी बैठक घेऊन गतीने काम होणेबाबत नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले. यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  यांनी स्वच्छता अभियान अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन कामाचा सविस्तर आढावा सादर केला. जे जे एम योजनेबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. यासोबत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट करण्यात येत असल्याचेही सांगितले.

शहरी भागाच्या पाणीपुरवठा मलनिस्सारण योजनांचा आढावा घेताना उदगीर पाणीपुरवठा योजना ३० ऑक्टोबर २०१९ पर्यंत चाचणी स्वरूपात चालू करावी, मलनिस्सारण योजनेस आवश्यक जागा मुख्याधिकारी उदगीर यांनी तातडीने उपलब्ध करून घ्यावीत, जळकोट नगरपालिकेसाठी पाणीपुरवठा योजनेची आखणी मुख्य अभियंता यांनी पाहणी करून कार्यवाही करावी, असे निर्देशही राज्यमंत्री श्री.बनसोडे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *