देशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल

सातारा, दि.२६ : अपशिंगे (मिलीटरी) गावाने देशासाठी दिलेले योगदान खूप महत्वाचे आहे. देशाला तसेच महाराष्ट्राला हेवा वाटेल असा या गावाचा विकास केला जाईल, अशी ग्वाही कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

अपशिंगे (मिलीटरी) येथे आयोजित ‘जय जवान जय किसान सन्मान’ मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास माजी सैनिक कल्याण विभागाचे पुणे विभागाचे उपसंचालक आर.आर. जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, निवृत्त बिगेडियर मोहन निकम, निवृत्त कॅप्टन उदाजी निकम,  प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, सरपंच सारिका गायकवाड, उपसरपंच उमेश निकम आदी उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध तसेच स्वातंत्र चळवळीत अपशिंगे (मिलीटरी) गावातील नागरिकांनी मोठा सहभाग घेतला होता. या गावाच्या विकासासाठी संबंधित विभागांना आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या असून यामध्ये रस्ते, भूमीगत गटारे, आरोग्य सुविधा देण्यावर भर दिला जाईल.  गावाचा विकास जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समितीमार्फत तसेच सीएसआर फंडातून विकास करण्यात येईल.

गावात कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. शेतकरी उत्पादक गट, गट शेती तसेच महिला बचत गटांना शासनामार्फत सढळ हाताने मदत केली जाईल. तसेच अपशिंगे (मिलीटरी) या गावाच्या विकासासाठी कुठेही निधीची कमतरता पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही  श्री. भुसे यांनी दिले.

प्रा. पाटील म्हणाले, सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या गावाला शौर्याची व प्रराक्रमाची परंपरा आहे. या गावाने शौर्याचा वसा व वारसा जपलेला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजु शेळके यांनी केले. या कार्यक्रमात वीर माता, वीर पत्नी, प्रगतशील शेतकरी यांचा सत्कारही कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *