मराठवाड्यातील रस्ते दर्जेदार करणार .

नांदेड प्रतिनिधि, दि.२७ :-  मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी काळी माती असल्यामुळे या ठिकाणचे सर्व रस्ते सिमेंट कॉक्रीटचे करण्यावर भर दिला जाईल. हे रस्ते दर्जेदार केले जातील. महत्त्वाचे म्हणजे मराठवाड्याचा सर्वांगिण विकास होण्यासाठी या विभागाला झुकते माप दिले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

औरंगाबाद तालुक्यातील शरणापूर, साजापूर, पंढरपूर, नक्षत्रवाडी  सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता व शरणापूर, साजापूर रस्ता (वडगाव रस्ता ते सैलानी बाबा चौक) रुंदीकरणासह चौपदरी सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन श्री. चव्हाण यांच्या हस्ते आज झाले. या निमित्ताने करोडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार अंबादास दानवे, महामंडलेश्वर परमानंद गिरी महाराज, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबादचे मुख्य अभियंता दिलीप उकीर्डे आदी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले की,  मराठवाडयाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरघोस निधी मिळण्याकरीता प्रयत्न केला जाईल. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्याचा विकास अधिक गतीमान करण्यासाठी या जिल्हयाला अग्रक्रमाने  निधी  दिला जाईल. उदयोग व पर्यटनामुळे औरंगाबाद जिल्हयात विशेषत: औरंगाबाद शहरात  वाहतुक वाढली आहे. तसेच शहराची व्याप्तीही  वाढल्याने  रस्ते अधिक दर्जेदार केले जातील. अर्थसंकल्पात औरंगाबाद जिल्ह्याकरीता पंधराशे सहा कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यातून रस्त्यांची अनेक कामे मार्गी लागत आहेत. पुढच्या दोन वर्षात जिल्ह्यात पुलांची व रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण केली जाणार आहेत. मिटमिटा ते हर्सुल रस्त्याच्या कामातही लक्ष घातले जाईल. लोकांनी मागणी केलेल्या कामाला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

खासदार जलील म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्यात चांगले रस्ते होत आहेत, ही आनंदाची बाब आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केला जाईल. करोडी येथे क्रीडा विदयापीठ  आणण्याची त्यांनी यावेळी मागणी  केली. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, करोडी येथे सर्व सुविधा दिल्या जात आहेत. येथील चारपदरी रस्ता एक वर्षाच्या आत पूर्ण केला जाईल. आमदार दानवे म्हणाले की, जिल्हयात मोठया प्रमाणात महामार्गांची कामे मार्गी लागत आहेत. विकासाच्यादृष्टीने जिल्हा प्रगती करीत आहे. शासनाने मिटमिटा ते हर्सुल रस्त्याचे काम मंजूर करावे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *