राज्यातील खराब झालेल्या सर्व महामार्गांची १५ ऑक्टोबरपूर्वी तातडीने दुरुस्ती करा

अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांचे निर्देश.

मुंबईदि. २७ : अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील सर्व खराब झालेल्या महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता असून १५ ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांवरील खड्डे डांबरमिश्रीत खडीने भरण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिले.

राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीसाठी अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सचिव (बांधकामे) अनिल गायकवाडराष्ट्रीय महामार्ग (सा.बां.) चे मुख्य अभियंता संतोष शेलारराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तवमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एस.के. सुरवसे आदी वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सुमारे १८ हजार कि.मी. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाची आणि देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर आहे. चार पदरी आणि त्यावरील राष्ट्रीय महामार्ग हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत आहेत. दि. १९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्ग मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे.  या दोन महामार्गांसह राज्यभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याबरोबरच १५ ऑक्टोबरपूर्वी खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी अपर मुख्य सचिव श्री. सौनिक यांनी दिले.

राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांनी कोकणात क्षेत्रीय स्तरावर मुक्कामी राहून युद्धपातळीवर कामे पूर्ण करण्याच्या सूचना देऊन वर्दळीच्या व जास्त पर्जन्यमान असलेल्या महामार्गांवर पावसाळ्यानंतर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे निर्देशही श्री. सौनिक यांनी यावेळी दिले. महामार्ग खराब झाल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी कार्यपद्धती विकसित करण्याच्या सूचनाही श्री. सौनिक यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *