पोलीस ठाण्याचा वन क्लीक एसओपी तयार करावा – गृहराज्यमंत्री सतेज पाटील

सिंधुदुर्गनगरी, दि. २९  –  जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याची माहिती येणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांना एका क्लीकवर उपलब्ध व्हावी यासाठी एसओपी तयार करावी. अशी सूचना देतानाच कोविड आणि तौक्ते वादळाच्या काळात चांगले काम केल्याबद्दल गृहराज्य मंत्री (शहरे) सतेज पाटील यांनी पोलीस दलाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

गृहराज्यमंत्री श्री. पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात विभागाचा, भारत नेट, म्हाडा/पंतप्रधान आवास योजना, परिवहन आणि एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित होते.

सुरुवातीला झालेल्या पोलीस विभागाच्या आढावा मनुष्यबळ उपलब्ध साधन सामग्री, सुविधा, राबवलेले उपक्रम, जिल्ह्याचा गुन्ह्यांबाबतची माहितीचे पोलीस अधीक्षक श्री. दाभाडे यांनी संगणकीय सादरीकरण केले.

राज्यमंत्री श्री.पाटील म्हणाले, कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचे काम पोलीस प्रशासनाने केले आहे. पोलीसांची विश्वासहार्ता टिकून आहे यावरच राज्याची प्रगती सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम पोलीस यंत्रणा करत आहे. प्रायोगिक तत्वावर पोलीस अधिकाऱ्यांनी तालुक्याचे पालकत्व घेऊन गावागावातील तंटे विशेषतः जमिनीविषयक महसूल यंत्रणेच्या समन्वयातून सोडवावेत. मोहल्ला समिती, शांतता समितीमध्ये १८ ते ३० वयोगटातील युवकांचा समावेश करावा. जिल्ह्यात बदली होऊन येणाऱ्या अधिकाऱ्यांना जिल्ह्याची माहिती एक क्लीकवर मिळावी यासाठी माहिती व तंत्रज्ञानचा वापर करून डाटा बेस तयार करावा.

ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना लसीकरणाबाबत विचारणा करावी. ते पूर्ण करण्यासाठी समन्वय करावा. जेटीच्या लॅडिंग पॉईंटच्या ठिकाणी सौर ऊर्जेवर आधारीत सीसीटीव्ही, जन सूचना प्रणाली कार्यान्वीत करावी. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळवावा. एनसीसीआरटी पोर्टलवरून सायबर गुन्ह्याबाबत प्राप्त झालेल्या पॉपअप नंतर बॅंकांना कळविल्यानंतर त्यांच्याकडून कोणता प्रतिसाद मिळाला याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत सादर करावा. पोलीस कल्याण निधी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांबाबत विशेषतः सुदृढ बालिका अनुदानविषयी जनजागृती करावी.

भारत नेटच्या कामकाजाबाबत आढावा घेऊन राज्यमंत्री श्री. पाटील यांनी अतिवृष्टी, वादळ याचा विचार करून नियोजन केले आहे का, यामध्ये काही बदल करता येत असतील तर तसे नियोजन ठेवावे, ग्रामपंचायती, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र ऑप्टिकल फायबरद्वारे जोडण्यात आले आहेत का? याविषयी नियोजन करावे. याकामकाजाबाबत जिल्ह्याची प्रगती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हाडा तसेच पंतप्रधान आवास योजनांबाबत येणाऱ्या सामायिक सातबारा, एनओसी, गावठाण समस्या याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावेत. देवगड येथे २४० घरांचा प्रकल्प लवकर पूर्ण करावा, असेही ते म्हणाले.

ॲटोरिक्षा परवाना धारकांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाबाबत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जे राहिले असतील त्यांना एसएमएस पाठवून अर्ज करण्याबाबत सूचना देण्याविषयी सांगितले. एसटी विभागाने जिल्हाधिकारी तसेच अन्य शासकीय कार्यालयांची मदत घेऊन माल वाहतुकीसाठी उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करावेत असेही राज्यमंत्री श्री. म्हणाले.

यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक नितीन बराटे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर, पोलीस उपअधिक्षक संध्या गावडे, एसटीचे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ आदी उपस्थित होते.

यावेळी सीसीटीव्ही सनियंत्रण कक्षास भेट देऊन गृहराज्यमंत्री श्री. पाटील यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *