‘सर्च’च्या शोधग्राम प्रकल्पातील कामे प्रशासकीय यंत्रणेसाठीही पथदर्शी

गडचिरोली, दि.१२ : गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि आदिवासी भागात डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग या दांपत्याच्या नेतृत्वाखाली सर्च संस्थेतर्फे विविध माध्यमातून सुरू असलेले सेवाभावी कार्य प्रशासनासाठीही पथदर्शी असल्याचे गौरवोद्गार राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील चातगाव येथे ‘सर्च’ संस्थेच्या शोधग्राम या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. सर्च संस्थेद्वारा विविध माध्यमातून सुरु असलेले काम त्यांनी जाणून घेतले.  डॉ.अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्याशी विविध उपक्रमांबाबत अनौपचारिक चर्चाही  केली . तसेच शस्त्रक्रिया होऊन बऱ्या झालेल्या रूग्णांसोबतही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी संवाद साधला व उपचार सुविधांबाबत माहिती जाणून घेतली.

शोधग्राम भेटीनिमित्त उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज्यपाल म्हणाले की, डॉ. बंग यांच्या शोधग्राम प्रकल्पातून विविध  उपक्रमशील मनांना प्रेरणा मिळते. या स्थळी येऊन हे सारे उपक्रम स्वत: अनुभवण्याची माझी खूप दिवसांपासून इच्छा होती. दोन वर्षापूर्वी मी गडचिरोलीत आलो होतो परंतु वेळेअभावी येथे येऊ शकलो नव्हतो.  दारूबंदी व तंबाखूबंदीचे काम कठीण आहे, ते सातत्याने केले पहिजे. उपदेश देणे सोपे आहे पण प्रत्यक्ष कार्य करणे कठीण आहे, ही खरोखरच एक साधना आहे. ती तुम्ही निष्ठेने करत आहात अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

कोरोना साथीबाबत राज्यपाल म्हणाले की कोरोना अजूनही संपलेला नाही, प्रधानमंत्र्यांनी आवाहन केल्याप्रमाणे कोरोना रोखण्यासाठी सुयोग्य काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी प्रतिबंधक  लसीकरणाबाबत या भागात जागृती व्हावी. निर्भय होतानाच जरुर काळजी  घ्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मी नेहमी अशा सेवाभावी संस्था आणि उपक्रमांना जाणीवेने भेट देत असतो . प्रशासकीय अधिकारी वर्गाला पण  अशा ठिकाणी नेत असतो. यातून मलाही खूप काही शिकायला मिळते  तसेच प्रशासनालाही काही चांगल्या बाबींची माहिती होते.  असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

या कार्यक्रमास राज्यपालांचे सचिव संतोष कुमार, नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधिक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *