महिला सुरक्षेसाठी मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे निर्देश

मुंबई दि.१५ – विविध संघटित व असंघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर महिला नोकरी करीत आहेत. या सर्व महिलांची सुरक्षा हा राज्य शासनाच्या दृष्टीने प्रधान्याचा विषय असून  गृह विभागाने सर्वसमावेशक  मार्गदर्शक नियमावली तात्काळ तयार करून जाहीर करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

राज्यातील माहिती तंत्रज्ञान प्रकल्प असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी गठित समितीने सुचविलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने आज  मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, माहिती तंत्रज्ञान सचिव आभा शुक्ला, अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार, सह आयुक्त वाहतूक राजवर्धन यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. वळसे-पाटील म्हणाले महिला सुरक्षेचा प्रश्न हा सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे. महिला विविध क्षेत्रात कार्यरत असून कामाच्या निमित्ताने रात्री उशीरापर्यंत बाहेर असतात. या सर्व क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व विभागाच्या नियमांचे तसेच वेळोवेळी गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीचा अभ्यास करून गृह विभागाने लवकरात लवकर मार्गदर्शक तत्वे तयार करावीत. तसेच त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अपर मुख्य सचिव, गृह यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच या मार्गदर्शक नियमावलीबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी अशा सूचनाही श्री वळसे-पाटील यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *