मुंबई, दि. २७ : राज्यातील कृषी आणि खाद्य उत्पादन निर्यात वाढावी, यासाठी शासनामार्फत सहकार्य करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. इंडिया बिझनेस ग्रुप चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधी मंडळाने अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परिमल सिंग उपस्थित होते.
राज्यातील केळीपासून तयार केलेली पावडर, गुळाची पावडर, मसाल्याचे पदार्थ इत्यादींची परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. उत्पादकांना लागणारे परवाने, टेस्टींग यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला सूचना देण्यात येतील. त्याचबरोबर महिला उद्योजकांना निर्यात उद्योगात येण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येईल, असेही डॉ. शिंगणे यांनी सांगितले.
या बैठकीला माली प्रजासत्ताकच्या (मानद) वाणिज्य दूत सुजाता पवार, इंडिया बिझनेस ग्रुप चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रिया पानसरे, विकास मित्रसेन, सचिन भांड, प्रीती शाह, सशीवदन शेट्टी व इतर प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी निर्यातयोग्य खाद्य पदार्थांचे नमुने आणि इंडिया बिझनेस ग्रुप चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांनी लिहिलेली पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.