नवी दिल्ली दि. २६ : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात आला. या निमित्त ‘भ्रष्टाचारविरूध्द लढा देण्याची….’ प्रतिज्ञा घेण्यात आली.
राज्यात दरवर्षी ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्यात येतो. यावर्षी २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ‘स्वतंत्र भारत @७५ : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे’ ही संकल्पना घेऊन केला जाणार आहे.
याअंतर्गत कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात अपर मुख्य सचिव तथा निवासी आयुक्त श्याम लाल गोयल यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना ‘भ्रष्टाचारविरूध्द लढा देण्याची…… ’ प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी सचिव व आयुक्त (गुंतवणुक व राजशिष्टाचार), अपर निवासी आयुक्त निरूपमा डांगे आणि सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात आला. जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक(अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना ‘भ्रष्टाचारविरूध्द लढा देण्याची……’ प्रतिज्ञा दिली. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.