उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय.
मुंबई, दि. २८ :- अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका महाड शहरातील छोटे व्यावसायिक, दुकानदारांसह व्यापारांना बसला होता. त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने मदत देण्यात येत आहे. या नुकसानग्रस्तांना मदतीसह इतर योजनांचा लाभ देताना शॉप ॲक्ट परवान्याव्यतिरिक्त त्यांच्याकडील इतर व्यावसायिक पुरावे ग्राह्य धरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला. महाड शहराला वारंवार पुराचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी सावित्री नदीत तयार झालेली बेटे आणि गाळ काढण्याची प्रक्रिया जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाने सुरु करण्याची सूचनाही यावेळी देण्यात आली.
महाड शहरातील पूर निवारणासंदर्भात कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप आदींसह स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाड शहराला अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा वारंवार फटका बसतो, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातून वाहणाऱ्या सावित्री नदीत तयार झालेली बेटे आणि गाळ काढणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाने तातडीने सुरु करण्याच्या सूचना यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच यावर्षी झालेल्या पूरस्थितीमुळे महाड शहरातील अनेक छोटे व्यावसायिक, दुकानदार, टपरीधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने त्यांना मदत देण्यात येत आहे. नुकसानग्रस्त दुकानदार, छोटे व्यावसायिक, टपरीधारकांना मदत आणि इतर सवलती देताना शॉप ॲक्ट परवान्याव्यतिरिक्त इतर व्यवसायिक पुरावे ग्राह्य धरण्याचा तसेच सावित्री नदीवरील दादली आणि गांधारी नदीवरील पुलाची उंची वाढविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.