मुंबई, दि. १० : मुंबईतील जवाहर बाल भवन इमारत जीर्ण झाली असून त्याचे नूतनीकरण आणि मजबुतीकरण करणे गरजेचे आहे. यासंबंधी कामाच्या अंदाजपत्रकास तातडीने तांत्रिक मान्यता देऊन पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मागील काही वर्षांपासून बाल भवनची इमारत जीर्ण झाली असून त्याचे तातडीने मजबुतीकरण आणि नूतनीकरण करणे गरजेचे असल्याने शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बाल भवन इमारतीचे उद्घाटन झाले होते. गेली ५० वर्षे विद्यार्थी आणि लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, करमणूक साधने, ग्रंथालय आदी माध्यमातून ही इमारत उपयोगी सिद्ध झाली आहे. येथे चित्रकलेसह विविध स्पर्धाही आयोजित केल्या जातात. या ऐतिहासिक इमारतीचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने या इमारतीच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.