मुंबई, दि. १०ग : महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य दिवंगत शरद नामदेव रणपिसे यांचे दिनांक २३ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेकरिता भारत निवडणूक आयोगाने ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे.
या निवडणुकीचे मतदान दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ (सोमवार) रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत व मतमोजणी त्याच दिवशी दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ (सोमवार) रोजी सांयकाळी ५.०० वाजता होणार आहे.
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिवस मंगळवार, दि. १६ नोव्हेंबर २०२१ आहे. बुधवार दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस सोमवार, दि. २२ नोव्हेंबर,२०२१ असा आहे. या निवडणूकीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बुधवार दिनांक १ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण होईल.
भारत निवडणूक आयोगाने कोविड-१९ संदर्भातील विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे तसेच यासंदर्भात अलीकडेच दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. या मार्गदर्शक सूचना https://eci.gov.in/candidate-political-parties/instructions-on-covid-१९/. संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.